शामसुंदर महाराज सोन्नर यांचे जनतेस आवाहन
आपले हक्क मिळविण्यासाठी एकजुटीने लढा!
शामसुंदर महाराज सोन्नर यांचे आवाहन
मुंबई / रमेश औताडे
शेतकरी किती संकटातून जात आहे, त्यांच्या समोर कोणकोणती आव्हाने आहेत, याची जाणीव शेतकरी कीर्तन महोत्सवातील तज्ज्ञ वक्त्यांनी आपल्याला करून दिली आहे. या संकटाचा सामना करीत आपले हक्क मिळवायचे असतील तर शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी, ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात काल्याचे कीर्तन करताना त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडविण्यासाठीच हा कीर्तन महोत्सव आहे, असे शेतकरी चळवळीतील अड. अजय बुरांडे म्हणाले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. या कीर्तन महोत्सवात 25 गावातील शेतकऱ्यांचा सहभाग असतो. या वर्षी शास्वत शेती ही मध्यवर्ती संकल्पना घेवून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. यात भजन कीर्तनाबरोबरच शास्वत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली होती. याचा संदर्भ देत शामसुंदर महाराज म्हणाले की, सात दिवसांत शेतीच्या ज्या प्रश्नावर आपण चिंतन केले आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकऱ्यांवरील संकट नैसर्गिक नाही तर ते मानव निर्मित आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अडचणीत आणू त्यांना शेती बाहेर काढायचे आणि ही शेती उद्योगपतींच्या घशात घालायची, हे आता स्पष्ट झाले आहे. हे कारस्थान उधळून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. या परिसरात शेतकरी चळवळ ही वेगवेळी आंदोलने, उपक्रम राबवून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्यावरील अन्याय्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी एकजुने आपल्या हक्कासाठी लढा उभारावा असा त्यांचा कायम प्रयत्न असतो. शेतकरी कीर्तन महोत्सव हा त्याचाच भाग असल्याचे शामसुंदर महाराज यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांनो एक व्हा
विजय आपलाच असेल- ॲड अजय बुरांडे
शेतकरी बांधवांनो रात्रच नाही तर दिवसही वैऱ्यांचा आहे. किती संकटात आपण आहोत, हे गेल्या सात दिवसांत आपण ऐकलेले आहे. आपल्याला आपल्या प्रश्नांची जाणीव होऊ नये म्हणून जात, धर्माच्या कैफात आपल्या गुंतवून ठेवले जात आहे. आपण जात, धर्माच्या नावाने विभागलो जावे. द्वेष, मत्सराच्या वणव्यात जळत रहावे आणि आपल्याला आपले प्रश्न गौन वाटावेत यासाठी ही कारस्थानं आहेत.
बांधवानो शेतकरी हीच आपली जात आणि शेती करणे हाच आपला धर्म आहे, या भावनेने सर्व जात-धर्मातील शेतकऱ्यांनी एक व्हावे आणि आपल्या प्रश्नासाठी लढावे. शेतकरी कीर्तन महोत्सव हा जात धर्माच्या पलिकडे जाऊन शेतकरी हा भावना दृढ व्हावी यासाठीच आहे. हा आपला प्रयत्न यशस्वी झाला आणि आपण एक होऊन शेतकऱ्यांच्या एकजुटीने लढा उभारला तर विजय आपलाच असेल, असा विश्वास अड. अजय बुरांडे यांनी व्यक्त केला.
बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
भारत सरकार नोंदणीकृत
रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment