लाईव्ह ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ; शासनाने हस्तक्षेप करावा – सुभाष जाधव
लाईव्ह ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ; शासनाने हस्तक्षेप करावा – सुभाष जाधव
कोरोना महामारीनंतर अनेक बार मालकांनी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अत्याधुनिक डी.जे. आणि लॅपटॉपद्वारे संगीत सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करणाऱ्या कलाकारांना बेरोजगार व्हावे लागत आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केली आहे.
२० हजारांहून अधिक कलाकार बेरोजगार
जाधव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुमारे २०,००० हुन अधिक कलाकार बारमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करतात. त्यामध्ये तमाशा, जागरण गोंधळ, शाहिरी पथक, दशावतार, बॅन्ड पथके आणि वाद्यवृंद कलाकारांचा समावेश आहे. मात्र, सध्या अनेक बारमधून परप्रांतीय कलाकारांना संधी दिली जात असून, हे कलाकार प्रत्यक्ष गाणे न गाता केवळ लिपसिंक (हावभाव) करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
महाराष्ट्रातील लोककला वाचवण्यासाठी नियम लागू करावा
राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्रातील लोकनाट्य केंद्रांमध्ये पारंपरिक वाद्य वाजविण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे हा नियम बार आणि पबसाठीही लागू करावा. म्हणजेच, बारमध्ये स्थानिक कलाकारांना अधिक संधी मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा
लाईव्ह ऑर्केस्ट्रा कलाकारांची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास सर्व कलाकारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, असा इशारा सुभाष जाधव यांनी दिला आहे.
कलाकारांचे मागण्या:
- बार आणि पबमध्ये केवळ लाईव्ह परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांनाच परवानगी द्यावी.
- परप्रांतीय लिपसिंक कलाकारांवर बंदी घालावी.
- मराठी लोककला टिकवण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.
- लाईव्ह ऑर्केस्ट्रा कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य आणि संरक्षण व्यवस्था करावी.
महाराष्ट्र सरकार या मागण्यांची दखल घेते का, याकडे संपूर्ण कला क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment