अस्पृश्यतेच्या काळोखातील मानवतेचा दिवा - सोनबा येवले
अस्पृश्यतेच्या काळोखातील मानवतेचा दिवा - सोनबा येवले
मुंबई / रमेश औताडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतील अनेक प्रसंग आजही प्रेरणादायी ठरतात. त्यापैकी एक घटना पनवेल नाका, रायगड येथील आहे.
१९२७ मध्ये महाड सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर महाडला जात असताना पनवेल नाक्यावर एका हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी थांबले. मात्र, त्या हॉटेलच्या मालकाने बाबासाहेबांना अस्पृश्य असल्याने पाणी देण्यास नकार दिला.
हा प्रसंग पाहून सोनबा येवले नावाच्या सज्जनाने तातडीने माठभर पाणी आणून बाबासाहेबांना देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासासाठी निघून गेले होते.
आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे आंदोलन दरम्यान या ठिकाणी आले असता त्यांनी हा प्रसंग सांगितला.
ही पाणपोई आजही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभी आहे. केवळ पाणी पाजणारा माठ नव्हे, तर समतेचा व मानवी हक्कांचा ध्वजधारक म्हणून सोनबा येवले आजही स्मरणात आहेत.
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा या घटनेच्या स्मरणार्थ सोनबा येवले यांना अभिवादन करून, बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचा प्रसार करत आहे. ही घटना आजच्या काळातही सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरते असे बागडे म्हणाले.
सोनबा येवले यांनी त्या काळातील जातीय विषमतेला छेद देत मानवतेचे दर्शन घडवले. त्यांच्या या कृतीतून समतेचा संदेश प्रकट झाला. आजही पनवेल नाक्यावरील त्या ठिकाणी सोनबा येवले यांच्या स्मरणार्थ पाणपोई उभारण्यात आली आहे. ही पाणपोई केवळ पिण्याच्या पाण्याचे ठिकाण नसून, ती मानवतेचा संदेश देणारे प्रेरणास्थळ आहे. असे बागडे यांनी सांगितले.
दरवर्षी बाबासाहेबांचे अनुयायी महाडला जाताना या पाणपोईचे दर्शन घेऊन सोनबा येवले यांना विनम्र अभिवादन करतात. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यंदाही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहे. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या समतावादी लढ्याचा वारसा जपत सोनबा येवले यांच्या कार्याचा गौरव करून, समाज परिवर्तनासाठी त्यांच्या योगदानाची आठवण सतत जागी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.
Comments
Post a Comment