बारामतीतील खाजगी विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह
मुंबई / रमेश औताडे
बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी या धावपट्टीच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे.
सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, बारामती परिसरात सुरू असलेली ही विमान धावपट्टी आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांशिवाय कार्यरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सिग्नल व्यवस्था, नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा या ठिकाणी अपुऱ्या असल्याचे ते सांगतात.
या पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी या धावपट्टीची सखोल तपासणी करावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामती परिसरात यापूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेचा संदर्भ देत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि आवश्यक असल्यास सुधारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
धावपट्टी तयार होताना मानवी जीवांच्या संदर्भात विचार केला नाही. बारामतीचा विकास करत असताना जर या धावपट्टीच्या तांत्रिक बाबी गांभीर्याने घेत त्या तांत्रिक बाबी उपलब्ध झाल्या असत्या तर अपघात झाला नसता असेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment