कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरविणार कां प्रज्ञा सातव ?

कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरविणार कां प्रज्ञा सातव ? 
     योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१     
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांनी ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत महाअधिवेशन भरवून भारतीय जनता पक्ष स्थापन केला. १९७७ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या जनता पक्षातून फुटून निघत आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाची 'पुण्याई' पदरात पाडून घेण्यासाठी 'भारतीय' हा शब्द पुढे लावीत भारतीय जनता पक्ष स्थापन करण्यात आला.  

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे दिग्गज नेते होतेच परंतु आज हा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ताब्यात घेतला असून २०१४ पासून या पक्षाची भूक इतकी वाढलीय की जणू काही 'भस्म्या' झालाय की काय असा प्रश्न पडावा. सगळ्या प्रादेशिक पक्षांबरोबरच इतर पक्षांतील नेते कार्यकर्ते यांना गिळंकृत करण्याचेच काम हा 'बकासूर' जनता पक्ष करीत सुटलाय. बरं, आरोपांच्या फैरी झाडायच्या आणि त्यांनाच आपल्या धुलाई यंत्रातून स्वच्छ करीत भाजप (भारत) स्वच्छता अभियानचा टेंभा मिरवायचा. लेखाचे शीर्षक 'कृतघ्नांच्या भाऊगर्दीत' असे दिले आहे, खरे तर 'एहसान फरामोश' हा शब्द वापरणार होतो, पण त्यातल्या त्यात जरा सुसंस्कृत शब्द म्हणून 'कृतघ्न' हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. तर अशा कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरविणार कां प्रज्ञा सातव? हा प्रश्न मनाला पडला आहे. त्याचं कारणच तसे आहे. 

रजनी सातव या कॉंग्रेस पक्षाच्या माजी मंत्री. कळमनुरी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करीत होत्या. त्यांचे चिरंजीव राजीव सातव यांच्यासाठी दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी शब्द टाकला आणि राहुल गांधी यांच्या शब्दाला मान देत शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत आपला विद्यमान मतदारसंघ राजीव सातव यांच्यासाठी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकला. राजीव सातव यांनी राहुल गांधी यांच्या विश्वासाला पात्र राहात पक्षात चांगले स्थान निर्माण केले. दुर्दैवाने राजीव सातव यांचे देहावसान झाले आणि राजीव पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. त्या दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून आल्या. परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजी, अन्याय अशी निरर्थक कारणे देत त्यांनी चक्क कमळ हातात घेऊन थेट राहुल गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसला. 

खरे म्हणजे २०१४ पासूनची भारतीय जनता पक्षाची भस्म्यासम वाटचाल पाहता कमळाऐवजी निवडणूक आयोगाने या पक्षाला खंजीर हेच निवडणूक चिन्ह देणे औचित्यपूर्ण ठरले असते. पण राष्ट्रीय काय किंवा राज्यातील निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाचे एक अंग होऊन बसली असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत ते काही खोटे नाही. मराठवाडा मधील नांदेड, हिंगोली सह सगळा भाग या बकासुराच्या नरड्यात गेला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मुळात शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे कधीही निष्ठावंत नव्हते. संजय गांधी यांचे जोडे उचलणारे असा आरोप आणिबाणीच्या काळात ज्यांच्यावर झाला होता ते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस स्थापन करते झाले आणि वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे असा आरोप ज्यांच्यावर झाला ते पुरोगामी लोकशाही दलाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील झाले. 

त्या निष्ठावंत नसलेल्या शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण हे आपल्या मित्रांना व परिवाराला घेऊन भारतीय जनता पक्षाचे राजकीय पर्यटन करायला निघाले, याचे कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु ज्या राजीव सातव यांच्या पक्षनिष्ठेवर राहुल गांधी यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्या धर्मपत्नी प्रज्ञा या राजीव सातव यांच्या निर्वाणानंतर राहुल गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि तमाम कृतघ्नांच्या भाऊगर्दीत हरवतील यावर विश्वास ठेवणे कठीण बनले होते. परंतु ही किमया देवाभाऊंनी 'करुन दाखविली'. मला या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त आणि कर्तव्यकठोर प्रशासक नंदलाल यांचे एक महत्त्वपूर्ण विधान आठवते. ते म्हणायचे की, मतदारसंघ हा मतदारसंघ आहे तो काही आमदार संघ किंवा खासदार संघ नाही. हे मतदारसंघ कुणाच्या सातबाऱ्यावर करुन दिलेले नाहीत. त्यामुळे जे जे निवडून आलेले नेते आहेत त्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत, मतदारसंघाचे मालक नाहीत, ही खुणगांठ मनाशी पक्की बांधून ठेवणे आवश्यक आहे. 

अर्थात आजमितीला हे सांगणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. 'मला या भागाचा विकास करायचा आहे, म्हणून मी पक्षांतर केले', अशी लोणकढी थाप प्रत्येक जण पक्ष बदलतांना मारीत असतो आणि तशी लोणकढी थाप प्रज्ञा सातव यांनीही मारली आणि 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हा 'नरेंद्रनारा' आवर्जून दिला. या प्रकरणामुळे पक्षश्रेष्ठींनी यापुढे विचार नक्की करावा आणि आपण कुणासाठी, कुणाकडे शब्द टाकतो, त्याचे पुढे काय होणार याची दक्षता घ्यावी. तूर्तास दिल्या घरी, नव्हे, गेलेल्या घरी सुखी रहा, एवढेच प्रज्ञा राजीव सातव यांच्या संदर्भात म्हणणे आपल्या हाती आहे. तमाम राजकीय पर्यटकांना ऐन निवडणुकीच्या मौसमात मनःपूर्वक शुभेच्छा ! प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे कोण कोण काय काय आडाखे बांधताहेत ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  
योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. 
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संपादक रमेश औताडे 
7021777291

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री