राजकारणासाठी पेन कंपनीची बदनामी ?
मार्कर पेन खरेदीवेळी बोठावरील शाई पुसते की नाही, याची तपासणीच झाली नाही का ?
मुंबई / रमेश औताडे
राजकीय आरोप–प्रत्यारोपांच्या गदारोळात आता थेट एका खासगी पेन कंपनीला लक्ष्य केले जात असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनबाबत संशय व्यक्त करत संबंधित कंपनीवर थेट आरोप केले जात आहेत. मात्र या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याआधी काही मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मार्कर पेन खरेदी करताना किंवा वापरापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली गेली होती का? शाई पुसली जाते की नाही, ती किती वेळ टिकते, याची चाचणी घेणे ही संबंधित यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी होती. ती पार न पाडता थेट कंपनीवर आरोप करणे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मार्कर पेनमध्ये शाईच्या गुणवत्तेत फरक असतो. त्यामुळे निविदा प्रक्रियेत स्पष्ट निकष, प्रयोगशाळा चाचण्या आणि प्रत्यक्ष वापराची चाचणी आवश्यक असते. या प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्या असत्या, तर आज निर्माण झालेला वादच उद्भवला नसता.
दरम्यान, कंपनीची बाजू ऐकून न घेता तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. एखादी चूक प्रशासनाच्या पातळीवर झाली असेल, तर तिची जबाबदारी झटकून खासगी कंपनीवर ढकलणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.
राजकीय नफा-तोट्याच्या गणितात कोणत्याही उद्योगाची प्रतिमा मलीन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आरोपांआधी वस्तुनिष्ठ चौकशी, तांत्रिक अहवाल आणि जबाबदारीची स्पष्टता आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.
Comments
Post a Comment