राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या
मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर
मुंबई / रमेश औताडे
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये व कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करत आहेत. सरकारने लवकरात लवकर गंभीर होत निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन बेमुदत केले जाईल. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. यावेळी आमदार मनोज जामसुतकर यांनीही या कामगाराच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुनही शासन दखल घेत नसल्याने बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे असे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सुरेश आहेरकर,मार्तंड राक्षे, बाबाराम कदम यांनी सांगितले.
राज्यातील सर्व रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ५ ते ६ मे रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली. तरीदेखील शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात घेता आजचे हे लक्षवेधी धरणे आंदोलन केले करण्यात आले असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर, करण सोनवणे यांनी यावेळी दिली.
सर्व रुग्णालये व विभागातील वर्ग-ड ची रिक्त पदे सरळसेवेने तात्काळ भरुन, सध्या सुरु असलेले खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मनोरुग्णालयातील ६३४ सफाईगारांची निरसित केलेली पदे पुनर्जिवित करावीत असे भगवान शिंदे,रामभाऊ पांचाळ,योगिता सोनवणे यांनी सांगितले.
कामगार विमा योजनेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे नवीन सेवाप्रवेश नियम तात्काळ तयार करावेत, छत्रपती संभाजीनगर च्या कामगार रुग्णालयातील भष्ट्राचारी, मनमानी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. आर. फडणीस यांची चौकशी करुन तिथून तात्काळ बदली करावी असे संध्या भोईटे, शुभांगी म्हामुणकर,अरुणा गायकवाड ,तेजस्विता आव्हाड,भारती माकवाना,अनिल घेगडमल,दिनेश कुचेकर,पराग आदिवडेकर, राजन राऊत यांनी सांगितले.
१४ एप्रिल १९८१ च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे, केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान मूळवेतन १८ हजार मिळावे असे विजय सुरवसे, रामदास शिराळे यांनी सांगितले.
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व राज्य शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना सफाई (घाणकाम) भत्ता लागू करावा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची १०,२०,३० आश्वासित प्रगती योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, सफाईगार पदावर काम करणाऱ्या सर्व जाती-प्रवर्गाच्या सफाईगारांना लाड-पागे समितीच्या वारसाहक्क योजनेचा लाभ मिळावा, जीर्ण झालेल्या शासकीय वसाहतींचे तात्काळ नुतनीकरण करावे. अश्या अनेक मागण्या राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या आहेत.
आजच्या लक्षवेधी धरणे आंदोलनाचीदेखील शासनाने दखल न घेतल्यास मात्र, कर्मचारी याहीपेक्षा अधिक आक्रमक होऊन पुढील महिन्यात सर्व रुग्णालयांमध्ये बेमुदत कामबंद संप आंदोलन पुकारतील याची नोंद शासनाने घ्यावी, अशी माहिती राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस बाबाराम कदम यांनी दिली.
Comments
Post a Comment