शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

              शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात
                    शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन 


मुंबई / रमेश औताडे 


सन २०१२ ते २०१९ पर्यंत कर्तव्य बजावलेल्या राज्यातील १०० पेक्षा कमी पट झालेल्या सर्व निदेशकांना नेमणूक मिळावी, विस्थापित झालेल्या निदेशकांना ते ज्या शाळेवर कार्यरत होते त्याच शाळेवर त्वरित नेमणूक मिळावी, सर्वांना नियुक्ती मिळाल्यानंतर ती नियुक्ती कायम करावी, त्यासाठी कायम संवर्ग तयार करावा, किमान वेतन व सर्व निदेशकांना शिक्षकाचा दर्जा देणे या प्रमुख मागणीसाठी कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक कृती समितीच्या वतीने  २० जानेवारी २०२५ सोमवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

यापूर्वी २३ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर व तत्कालीन शिक्षणायुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील सर्व निदेशकांच्या नेमणुकी संदर्भात १०० पट होण्यासाठी दोन,तीन, व गरज पडल्यास चार,पाच   शाळा एकत्र करू असे आश्वासन दिले होते.

ते आश्वासन त्यांनी पाळले नाही.  १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकात १०० पेक्षा कमी पट असलेल्या निदेशकांच्या नियुक्ती संदर्भात कोणतीच सूचना केली नाही. त्यामुळे राज्यातील १०० पेक्षा कमी पट असलेल्या निदेशक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे. शिवाय १०० पट असलेल्या निदेशकांच्या शाळेवर याचिकाकर्त्यांना नियुक्ती दिल्याने विस्थापित झालेल्या अनेक निदेशक शिक्षकांना अद्याप नेमणूक मिळाली नाही. आमच्या मागण्या लवकर मान्य झालं नाही तर यापुढे तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असे कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. 

कृती समितीचे महेश कुलकर्णी, भागवत शिंदे, कल्पना गरुड, पुष्पा राहागंडाले, प्रिया बीसेन, सुयोग सस्कर, युवराज पाटील, सुहास पाटील भतेश पाडवी यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील निदेशक यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"