आपल्याच माणसाला विसरलेले शहर!*
*आपल्याच माणसाला विसरलेले शहर!*
लीना रमेश प्रभू, विलेपार्ले, मुंबई.+91 98216 06488*
विले पार्ले (पूर्व), मुंबई येथील छत्रपती शहाजी राजे मार्गावर उभारलेली सहा मजली भव्य इमारत पाहण्याचा योग आला. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत भारताचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. श्री. मनोहर पर्रीकरजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समर्पित करण्यात आलेली आहे. सार्वजनिक जीवनात समर्पितपणे कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा असा गौरव पाहून मनापासून समाधान वाटले.
परंतु त्याच क्षणी मनात एक तीव्र आणि वेदनादायी जाणीव दाटून आली. विले पार्ले आणि मुंबई आपल्या सर्वांत कर्तृत्ववान व्यक्तींपैकी एकाला विसरली आहे.
पन्नास वर्षांहून अधिक काळ विले पार्ले आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणताही थकवा न दाखवता समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. डॉ. रमेश यशवंत प्रभू. मुंबईचे माजी महापौर, तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा आमदार असलेल्या डॉ. प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेस अर्पण केले.
विले पार्ले (पूर्व) परिसराचा विकास पाहिला, तर त्यांच्या कार्याचा ठसा सर्वत्र दिसतो.
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, शिरोडकर रुग्णालय, वीर सावरकर केंद्र, गावडे रुग्णालय, शहाजी विद्यालय,
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, जॉगर्स पार्क, जुहू येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि इतर.
पायाभूत सुविधांपुरतेच नव्हे, तर देशाच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातही डॉ. प्रभू यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नसून जीवनपद्धती आहे, हे अधिकृतपणे अधोरेखित झाले. तसेच १९९५ मध्ये शिवसेना–भाजप महायुती अस्तित्वात येण्यामागे त्यांच्या ऐतिहासिक राजकीय आहुतीचा निर्णायक वाटा होता. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली.
आणि तरीही, इतके सर्व असूनही, विले पार्ले किंवा मुंबईमध्ये स्व. डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या नावाने एकही शासकीय संस्था, इमारत किंवा सार्वजनिक आस्थापना नाही, ही वस्तुस्थिती अंतःकरणाला बोचणारी आहे.
हे मौन वेदनादायी आहे.
जे स्वतःला पार्लेकर म्हणवतात, आणि जे डॉ. प्रभू यांना प्रेरणादायी, आदर्श व मार्गदर्शक मानतात. ज्यांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्य अनुकरणीय असून पुढील पिढ्यांनी आत्मसात करावे, त्यांनी स्वतःला एक कठोर प्रश्न विचारायला हवा. आपण त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अपयशी ठरलो नाही नां? अत्यंत अपयशी?
हे खरे आहे की डॉ. प्रभू यांनी कधीही सन्मान, गौरव किंवा प्रशंसांची अपेक्षा केली नाही. पण जेव्हा मुंबईतील आणि देशभरातील लाखो लोक दररोज त्यांच्या कार्याचा लाभ घेत आहेत, पिढ्यानपिढ्या त्यांनी उभारलेल्या संस्थांचा उपयोग करीत आहेत, तेंव्हा त्यांच्या स्मृतीस शासकीय पातळीवर मान्यता न देणे हे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय करणारे नाही का?
आपण इतके स्वार्थी झालो आहोत का ? की दोन्ही हातांनी घेतो, पण परत देण्यासाठी काहीच उरत नाही? समाजासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या स्मृतीप्रती आपली जबाबदारीच नाही का?
ही केवळ एखाद्या इमारतीच्या नावाची मागणी नाही. हा प्रश्न आहे अंतःकरणाचा, कृतज्ञतेचा, आणि समाज म्हणून आपण खऱ्या लोकसेवेचा सन्मान करतो की काम संपताच ती विसरुन कृतघ्न ठरतो, याचा.
अत्यंत दुःखद आणि अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेने हे शब्द लिहीत आहे.
*-लीना रमेश प्रभू, विलेपार्ले, मुंबई.+91 98216 06488*
Comments
Post a Comment