दहा मिनिटांच्या स्पर्धेत अनेकांचे जीव धोक्यात
डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना हरताळ
मुंबई / रमेश औताडे
अवघ्या काही मिनिटांत वस्तू पोहोचवण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना सर्रास हरताळ फासला जात असून, याचा थेट फटका डिलिव्हरी कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
झेप्टो, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट यांसारख्या कंपन्यांकडून डिलिव्हरीसाठी ठरवून दिलेले वेळेचे बंधन पाळण्यासाठी कर्मचारी वेगमर्यादा, सिग्नल आणि इतर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक वेळा निष्पाप नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.
वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत डिलिव्हरी वाहनांशी संबंधित अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक डिलिव्हरी कर्मचारी विमा, सुरक्षा साहित्य किंवा योग्य प्रशिक्षणाशिवाय रस्त्यावर उतरवले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
कामाच्या दबावाखाली कर्मचारी जीव मुठीत धरून वाहने चालवत आहेत. मात्र, अपघात झाल्यास कंपन्या जबाबदारी झटकत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ नफ्यासाठी मानवी जीवन धोक्यात घालणाऱ्या या पद्धतीला आळा घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिलिव्हरी कंपन्यांवर दंडात्मक कारवाई, सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली आणि कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण सक्तीचे करावे, अशी मागणी स्माईल फाऊंडेशन सामाजिक संघटना व नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment