गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
मुंबई / रमेश औताडे
गरीब वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे, सर्वांगीण आणि पूर्णतः मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने क्रिस्टेल हाऊस इंडिया या सामाजिक संस्थेने अत्याधुनिक क्रिस्टेल हाऊस स्कूल सुरू करत देशाची भावी पिढी सुसंस्कृत करण्याचा विडा उचलला आहे.
या उपक्रमांतर्गत ठाणे खारघर–कळवा परिसरात आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज शाळा उभारण्यात येणार असून सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येईल. ठाणे महानगर पालिकेला सोबत घेत ही शाळा सुरू होणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मोफत गणवेश, पुस्तके, वहातूक, भोजन आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता २ पर्यंत २१० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून पुढील वर्षांत ही शाळा टप्प्याटप्प्याने इयत्ता १२ पर्यंत वाढवण्यात येईल.
विद्यार्थ्यांची निवड गरिबी-आधारित व पारदर्शक प्रक्रियेतून केली जाणार असून समाजातील सर्वात वंचित कुटुंबांतील मुलांना प्राधान्य दिले जाईल.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर, कौशल्यविकासावर आणि सामाजिक जाणीव वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. इयत्ता १२ नंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाचीही मदत दिली जाणार आहे.
या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने सांगितले की, हा प्रकल्प वंचित समुदायातील मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. क्रिस्टेल हाऊस इंडियाच्या अनुभवाचा लाभ ठाण्यातील विद्यार्थ्यांना मिळणार असून हा उपक्रम सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे उत्तम उदाहरण ठरेल.
ही शाळा जून २०२६ पासून सुरू होण्याची अपेक्षा असून भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
Comments
Post a Comment