घणसोलीत रासायनिक सांडपाण्याने नागरिक त्रस्त;

घणसोलीत रासायनिक सांडपाण्याने नागरिक त्रस्त; 

पर्यावरण रक्षक समितीची चेतावणी – 

“कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरणार”


नवी मुंबई / रमेश औताडे 


घणसोली MIDC परिसरातील औद्योगिक कंपन्यांकडून नियमबाह्यरित्या सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी आता नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी गंभीर संकट बनले आहे. रात्री उशिरा या कंपन्या उपचार न केलेले केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात सोडतात, ज्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधीचा विळखा तयार होतो. घणसोली, कोपरखैराणे गाव परिसर, तसेच अनेक गृहनिर्माण संकुलांत श्वसनाचा त्रास, डोळ्यांत जळजळ आणि त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.

या वाढत्या प्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवासी, महिला गट, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत “पर्यावरण रक्षक समिती” स्थापन केली आहे. समितीने स्पष्टपणे सांगितले की, “कागदोपत्री कारवाई नाही; आम्हाला प्रत्यक्ष परिणाम हवा.”

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDC हे फक्त नोटीस टाकून आपली जबाबदारी संपली असे समजतात. पण प्रदूषण थांबवण्यासाठी प्रत्यक्ष सीलबंदी आणि दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.

समितीने दिलेल्या माहितीप्रमाणे, घणसोलीतील अनेक शाळांमध्ये लहान मुलांना त्रास होत आहे. खेळाच्या मैदानात असलेली धूळ आणि नाल्यातून येणारा दुर्गंध यामुळे काही शाळांतील पालकांनी लिखित तक्रारी दिल्या आहेत.

पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ नुसार कुठलीही औद्योगिक कंपनी Effluent Treatment Plant (ETP) शिवाय सांडपाणी सोडू शकत नाही. मात्र पर्यावरण रक्षक समितीच्या मते ...

“MIDC मध्ये अनेक युनिट्स केवळ कागदावर ETP दाखवतात; प्रत्यक्षात ते बंद असतात किंवा कार्यरतच नाहीत.”

समिती लवकरच सोशल मीडियावर #SaveGhansoli #MPCBActNow #MIDCResponsibility अशा हॅशटॅग्ससह डिजिटल मोहीम सुरू करणार आहे. अनेक पर्यावरणवादी संघटना आणि स्थानिक रहिवासी या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. औद्योगिक विकास आम्हाला मान्य आहे. पण नागरिकांचा गळा घोटून नाही, असे समितीने सांगितले.

MIDC आणि MPCB ने १५ दिवसांच्या आत ठोस कारवाईचा आराखडा न दिल्यास आम्ही माननीय आयुक्तालय आणि मंत्रालयावर मोर्चा काढू  अशी चेतावणी समितीने दिली आहे.




Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन