वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे ......सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांची पावसाळा रेल्वे प्रवासी सुरक्षा व नियोजन
मुंबई / रमेश औताडे
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट 2025) सकाळी 11.10 वाजल्यापासून सायन व कुर्ला स्थानकांदरम्यान पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल व मेल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
स्थानकांवर वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिसांनी आजूबाजूच्या शहर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून योग्य तो बंदोबस्त उभा केला. एमआरए, डोंगरी, पायधुनी, आग्रीपाडा, भायखळा शहर पोलिस ठाण्यांसह आझाद मैदान वाहतूक विभागाचे अधिकारी रेल्वे स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले.
त्याचप्रमाणे कुलाबा येथील बेस्ट प्रशासनाशी समन्वय साधून सीएसएमटीजवळून अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली. फलाटांवर गर्दी वाढल्याने वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचारी मेगाफोनद्वारे प्रवाशांना सूचना देत होते.
दरम्यान, मुंबईचे लोहमार्ग पोलिस आयुक्त तसेच मध्य परिमंडळाचे पोलिस उपायुक्त यांनी सीएसएमटी स्थानकाची पाहणी करून बंदोबस्ताची माहिती घेतली व प्रवाशांशी संवाद साधला.
सायंकाळी सुमारे 7.18 वाजता सीएसएमटीहून कल्याणकडे पहिली स्लो लोकल रवाना करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकल वाहतूक सुरू झाली. मात्र जलद मार्गावरील वाहतूक व हार्बर मार्गावरील पनवेलकडील गाड्या अद्याप बंदच राहिल्या आहेत.
दरम्यान, सीएसएमटीहून सुटणाऱ्या काही मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही रीशेड्युल किंवा शॉर्ट-टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. सध्या स्थानक परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे.
— संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे
Comments
Post a Comment