शेतकऱ्यांचा पाण्यासाठीचा २८ वर्षाचा वनवास संपणार कधी !
शेतकऱ्यांचा पाण्यासाठीचा २८ वर्षाचा वनवास संपणार कधी !
अधिवेशनात सरकारने न्याय द्यावा - अशोकराव टाव्हरे
मुंबई / रमेश औताडे
राजगुरुनगर तालुक्यातील कळमोडी उपसा सिंचन योजनेचा सुधारित अहवाल आणि फेर जलनियोजन प्रस्ताव अद्याप शासनाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या २८ वर्षांपासून रखडलेली ही योजना पुन्हा गती पकडेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे भामा-आसखेड विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एस. करे यांनी सद्यस्थितीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला आहे.
या योजनेत मुळच्या ५०६५ हेक्टर सिंचन क्षेत्रासोबतच वाढीव १५५७ हेक्टरचा समावेश करून एकूण ६६२२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. खेड तालुक्यातील कनेरसर, पुर, वरूडे, वाफगाव व भीमाशंकर परिसरातील कुडे आणि एकलहरे ही गावे यामध्ये येतात.
टाव्हरे म्हणाले, सुप्रमा अहवाल, पीक रचना व फेरजलनियोजनाचे काम प्रलंबित आहे. आता जलसंपदा विभागाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि सुप्रमास तातडीने मंजुरी घ्यावी.
शेतकऱ्यांचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी आता शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment