सामाजिक कार्यकर्ते हनुमंत टाव्हरे यांच्या पाठपुराव्याला यश

बदलापूर बॅरेज रोडवरील रेल्वे पादचारी पूल लवकरच पूर्णत्वास

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत टाव्हरे यांच्या पाठपुराव्याला यश


मुंबई / रमेश औताडे

बदलापूर येथील बॅरेज रोडवर रेल्वेच्या चार पटरींवरून पूर्व-पश्चिम दिशांना जोडणारा पादचारी पूल लवकरच पूर्ण होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सावळेराम टाव्हरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली असून, हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

हनुमंत टाव्हरे यांनी हा पूल बांधण्याची मागणी पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे विभागाकडे लेखी पत्रव्यवहार व ईमेलच्या माध्यमातून केली होती. त्यांच्या या मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. त्यांना थेट फोन, ईमेल आणि मेसेजद्वारे प्रतिसाद मिळाला असून, रेल्वे डिव्हिजन मॅनेजरकडून देखील पत्ररूपाने प्रतिक्रिया देण्यात आली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी टाव्हरे यांच्या सांगण्यानुसार दिलेल्या पोल नंबरच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्या जागेवर पूल मंजूर केला. या प्रक्रियेबाबत रेल्वे अधिकारी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून टाव्हरे यांना सातत्याने माहिती देत होते.

टाव्हरे यांनी सांगितले की, गावदेवी (पूर्व) ते अरिहंत बिल्डिंग (पश्चिम) या दरम्यान नागरिक, विशेषतः महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी दररोज चार पटरी ओलांडून जीव धोक्यात घालून ये-जा करतात. याठिकाणी शाळा असून काही ठिकाणी रेल्वेने संरक्षक भिंत उभारल्याने विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारावा लागत होता. अरिहंत बिल्डिंगसमोर मोकळी जागा असल्याने नागरिक सरळ पटरीवरूनच ये-जा करत असतात. काही वेळा दोन गाड्या समोरासमोर उभ्या असल्यास मुले ट्रेनच्या खाली वाकून जाण्याचा धोकादायक प्रकार घडत असे.

या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली. आता हे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या एक-दोन महिन्यांत पूल नागरिकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.

“हा पूल कुठल्याही राजकीय दबावाविना, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सहकार्याने साकारत आहे. त्यामुळे मी पंतप्रधान, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि सहकार्य करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानणार आहे,” असे हनुमंत टाव्हरे यांनी सांगितले.

हा पूल बदलापूरकरांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन