मेघमल्हार चा भीमजयंती महोत्सव उत्साहात
मेघमल्हार चा भीमजयंती महोत्सव उत्साहात
नवी मुंबई / रमेश औताडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मेघ मल्हार संकुलात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत चार दिवसीय भव्य भीमजयंती महोत्सव अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
महोत्सवाची सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्ताने लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष स्पर्धांनी झाली. यामध्ये चित्रकला, निबंधलेखन आणि प्रश्नमंजुषा यासारख्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला.
"महात्मा फुले आणि बाबासाहेब - गुरु शिष्याचे नाते" या संकल्पनेवर आधारित चित्रकलेतून मुलांनी बाबासाहेबांचे विचार रंगवले, तर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तन" या विषयावर लिहिलेल्या निबंधांनी उपस्थितांची मने जिंकली.
१२ एप्रिल रोजी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्य, नाटिका व प्रेरणादायी सादरीकरणे सादर करण्यात आली. लहानग्यांपासून युवकांपर्यंत प्रत्येक सादरीकरणात बाबासाहेबांवरील निस्सीम श्रद्धा आणि प्रेरणा दिसून आली.
१३ एप्रिलचा दिवस ऑर्केस्ट्रा शोने गाजला. भीमगीतांचा जल्लोष आणि संगीताचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रसिद्ध गायक आणि वादकांच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
१४ एप्रिल रोजी महामानवाला अभिवादन करून सुरू झालेली भव्य मिरवणूक संपूर्ण परिसरात उत्साहाने फिरली. वाद्य, बॅनर, झेंडे, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर ‘जय भीम’ च्या घोषणांनी दुमदुमला.
सायंकाळी आयोजित केलेल्या भीमसंध्येचे विशेष आकर्षण ठरले – ज्यामध्ये भीमगीतांचा रंगारंग कार्यक्रम आणि अल्पोपहार यामुळे उत्सवाला परिपूर्णता लाभली.
या पार पडलेल्या महोत्सवात संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोलाचा सहभाग नोंदवून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवले.
Comments
Post a Comment