सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कामगार मंत्री सकारात्मक
सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ -
कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई / रमेश औताडे
सरकारने सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांनी शिष्टमंडळासोबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी कामगार मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन भोसले यांना दिले.
सुरक्षा रक्षक मंडळ १९८१ साली स्थापन झाले. दिवंगत कामगार नेते माधवराव भोसले यांनी या " वॉचमन " ला " सुरक्षा रक्षक " म्हणून कायद्याच्या चौकटीत बसवले. परप्रांतीय कंत्राटदाराने दिलेला तुटपुंजा पगार हा " वेतन " या व्याखेत बसवत सुरक्षा रक्षकांना कायद्याचा आधार दिला. त्यानंतर आजपर्यंत आम्ही न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढत १९८१ पासून या सुरक्षा रक्षकाला न्याय देत आहे. जोपर्यंत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करत नाही तोपर्यंत पाठपुरवा सुरूच राहील असे यावेळी कामगार नेते लक्ष्मण भोसले यांनी सांगितले.
सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत काम करणारे सुरक्षा रक्षक यांच्या वेलफेअर संदर्भात व इतर सर्वच मागण्यांबाबत कामगार मंत्री सविस्तर बोलले. सुरक्षा रक्षक यांच्या मागण्या हा त्यांचा हक्कच आहे. सरकारने जर त्यांचा हक्क त्यांना वेळोवेळी दिला तर त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही. असे सांगत भोसले म्हणाले, सरकार आता या प्रकरणी गंभीरपणे विचार करीत आहे. सुरक्षा रक्षकांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.
Comments
Post a Comment