शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढदिवसाच्या दिवशी उपोषण;

शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढदिवसाच्या दिवशी उपोषण; 
१८ मार्चपासून पुन्हा आझाद मैदानावर लढा उभारण्याचा निर्धार

मुंबई / रमेश औताडे 

मुरबाड तालुक्यातील लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषण करत आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. गेली २५ वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या हिंदुराव यांनी नेहमीच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला असून, सरकारकडून सातत्याने आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

या उपोषणाला शहापूर येथील झुंजार आंदोलक डॉ. अपर्णा खाडे यांनी पाठिंबा दर्शवत, सरकारने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांनुसार शेतकऱ्यांना भात धान्य प्रकरणी हक्काचा बोनस द्यावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी शासनाच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आणि शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलणे हा अन्याय आहे, असे मत मांडले.

या आंदोलनात कॉ. रमेश गायकवाड, सुधाकर शेळके, भास्कर शिंदे, संतोष पवार व इतर शेतकरी सहभागी झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी आपली परिस्थिती मांडत सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी आश्वासने दिली आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. रविंद्र चव्हाण, मा. छगन भुजबळ, मा. धनंजय मुंडे आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांनी वेळोवेळी आंदोलकांना सकारात्मक आश्वासने दिली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा बोनस आणि इतर सवलती मिळालेल्या नाहीत. त्यामुळेच सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी हिंदुराव यांनी केली.

सरकारी कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी असल्याने या मागण्यांवर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंगळवार १८ मार्च २०२५ पासून पुन्हा आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार हिंदुराव यांनी व्यक्त केला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन