देशातील ३२ राज्यातून " स्वच्छतादूत " म्हणून धारावीतील महिलेची निवड
देशातील ३२ राज्यातून " स्वच्छतादूत " म्हणून धारावीतील महिलेची निवड
मुंबई / रमेश औताडे
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एक महिला आशिया खंडात परिचित असलेल्या धारावी सारख्या ठिकाणी येऊन महिलांना एकत्र करत स्वच्छ्ता अभियान व महिला बचत गटाचे काम करत करते. त्या महिलेची देशभरातील ३२ राज्यांतून स्वच्छतादूत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवड होते. हे आमचे भाग्यच आहे. यापेक्षा आम्हाला अजून काय पाहिजे. असे सांगत धारावी व माण तालुक्यातील जनतेने निवड झालेल्या स्वच्छतादूत रेणुका सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छ्तेची कामे रेणुका सोनवणे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून केली व करत आहेत. सातारा जिल्ह्यातील म्हसवड, तालुका माण येथील शंकूतला आण्णा खाडे (पुजारी) यांच्या त्या कन्या आहेत. १९९७ साली लग्नानंतर त्या धारावीतील पारशी चाळ येथे वास्तव्यास आल्या.
त्यानंतर पती सुरेश सोनवणे यांचा चामड्यापासून पासून पाकीट बनवणे हा व्यवसाय व यांच्यासोबत आपल्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळत महिलांना एकत्र करत त्यांच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवत होत्या.
स्वच्छ भारत अभियान हे आत्ता सुरू झाले असले तरी रेणुका सोनवणे यांनी स्वच्छतेचा विडा अनेक वर्षापूर्वीच उचलला होता. आशिया खंडात परिचित असलेली झोपडपट्टी म्हणजे धारावीची वस्ती. कोरोना काळात त्यांनी या वस्तीत स्वच्छतेचे काम केले. महिलांना रोजगार देणे सर्वजण करतात मात्र रोजगार देत स्वच्छतेचे धडे शिकवणे मोठे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच त्यांचा देशातील ३२ राज्यातून स्वच्छतादूत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवड होऊन सत्कार होणे मोठी गोष्ट आहे. आता देशपातळीवर नाव केले आहे. यापुढे जगभरात कार्य सुरू करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments
Post a Comment