अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही
अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही
मुंबई / रमेश औताडे
कमी वयात निधन झालेल्या पत्रकार नितीन चव्हाण यांच्या उपचारासाठी आपण कुठेतरी कमी पडलो.अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही अशी खंत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकार भवनात शुक्रवारी आयोजित शोकसभेच्या वेळी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे दिवंगत सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, नितीन चव्हाण व रघुनाथ घानकुटकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार भवनात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, विश्वस्त राही भिडे, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी,ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, दूरदर्शनचे जयू भटकर, विलास मुकादम, सदानंद खोपकर आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी संदीप चव्हाण म्हणाले, विजय वैद्य यांचे ग्रंथ प्रेम मोठे होते. पुस्तक त्यांचा प्राण होता. योगेश त्रिवेदी यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या चितेवर त्यांच्या आहुती वृत्तपत्राचा अंक ठेवावा. तर विजय वैद्य म्हणाले होते माझ्या अंत्यात्रेत माझ्या उशीखाली त्या दिवशीचे सर्व वृत्तपत्राचे अंक ठेवा. जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए असे नितीन चव्हाण सांगायचा. पत्रकारिता माझी कमिटमेंट आहे असे नितीन म्हणायचा. त्याची साता समुद्रापार पत्रकारिता होती. दुबईतून पाच लाख मदत आली. अजून मदतीसाठी शाहरुख खान व अक्षय कुमार यांची भेट घेणार होतो. नितीनसाठी एक नाटकाचा प्रयोग करणार होते. ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नितीन ऑफिसला जायचा. मात्र अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही. नितीनचा मोबाईल क्रमांक डिलिट करू नका अजूनही अनेकांचे फोन येत आहेत. त्याचा वसा त्याचा मुलगा चालवेल. त्यांच्या कुटुंबाने पत्रकार संघात कधीही यावे संघ तुमचाच आहे. असे चव्हाण यांनी सांगितले. नीला उपाध्ये शिक्षिका होत्या माझ्या त्या आमची माय होत्या. अशी आठवण चव्हाण यांनी सांगितली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी या चारही पत्रकारांच्या सोबत पत्रकारिता करताना आलेले अनुभव सांगितले. भिकऱ्यांची संघटना काढून मला अध्यक्ष केले तरी चालेल असे सांगणारे वैद्य पत्रकरितले भीष्माचार्य होते. नितीन चव्हाण व मी सामना मध्ये एकत्र काम करत होतो. ते एक हरहुन्नरी पत्रकार होते. पत्रकार मारुती मोरे व सचिन धानजी यांनी नितीन यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी खूप धावपळ केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले मात्र आपण नितीन चव्हाण यांना वाचवू शकलो नाही. असे योगेश त्रिवेदी यांनी सांगितले.
विजय वैद्य यांच्या घरी मी सहावीत असताना त्यांच्या घरी वृत्तपत्र टाकत होतो. अशी एक आठवण सदानंद खोपकर यांनी सांगितली. पत्रकार संघाने पत्रकारांच्या आरोग्य निधीसाठी एका मोठ्या फंडाची उपलब्धता करावी असे आवाहन खोपकर यांनी केले.
यावेळी बोलताना माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सांगितले की, रघुनाथ घानकुटकर डोळस पत्रकार होते. त्यांच्या दिवाळी अंकात ते जीव ओतून काम करत होते. नीला उपाध्ये या पत्रकार संघाच्या कार्यवाह असताना त्यांनी पत्रकारांच्या मुलांच्या स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत मला बक्षीस मिळाले ते माझे पाहिले बक्षीस होते. विजय वैद्य यांचे पुस्तकावरील प्रेम खूप मोठे होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला तर पहिला पुरस्कार त्यांनाच मिळायला हवा. नितीन आजारी असतानाही पत्रकारिता करत होता त्यांनी कधीही आजारपणाचा बाऊ केला नाही. तत्वाने जगणारे हे पत्रकार संघाचे हिरे होते.
यावेळी राही भिडे यांनी या सर्व पत्रकारांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. इतके महान पत्रकार होते हे सर्व. यावेळी देवदास मटाले म्हणाले, आयुष्याची टर्म पूर्ण करण्याअगोदर नितीन गेला. जे आहे ते छापायचेच असा बिनधास्त पत्रकार होता. विजय वैद्य यांच्याशी माझी छान मैत्री होती. निलाताई मला लाडाने टोण्या म्हणायची. देहदान करा व शोकसभा करू नका असे त्यांनी सांगितले होते.
Comments
Post a Comment