कासवगतीने धावणाऱ्या आयुष्मान कार्डने गती घ्यावी
राज्यातील ६३ टक्के लाभार्थ्यांना अद्याप कार्ड नाही
मुंबई / रमेश औताडे
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत आरोग्य विभागाची गती अत्यंत संथ असल्याचे चित्र समोर आले आहे.
राज्यातील तब्बल ६३ टक्के पात्र लाभार्थ्यांना अद्याप आयुष्मान कार्ड मिळालेले नाही, ही बाब चिंतेची ठरत आहे. योजनेअंतर्गत राज्यात ९ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र आजघडीला केवळ ३ कोटी ४४ लाख कार्डचीच निर्मिती पूर्ण झाली असून उर्वरित नागरिक कार्ड पासून वंचित आहेत. कार्ड नसल्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ मिळताना अडचण येत आहे.
विशेषतः ग्रामीण भाग, शहरी झोपडपट्ट्या, स्थलांतरित कामगार, असंघटित क्षेत्रातील मजूर यांच्यापर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री योजना प्रभावी असली तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना कार्ड मिळण्यात होणारा विलंब ही मोठी अडचण ठरत आहे.
दरम्यान, नवीन वर्षात ८० ते ९० टक्के आयुष्मान कार्ड वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आतापर्यंतच्या कासवगतीच्या कामकाजामुळे हे उद्दिष्ट प्रत्यक्षात साध्य होईल का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आरोग्य सेवा ही ऐच्छिक नसून मूलभूत गरज आहे. त्यामुळे आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेला वेग देऊन प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत योजना पोहोचवणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. नवीन वर्षात तरी आयुष्मान कार्डच्या कासवगतीने धावणाऱ्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळावी, अशी अपेक्षा राज्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment