भिमा कोरेगावला जाणाऱ्या भिमसैनिकांनी वढबुद्रकला भेट द्यावी
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी भिम सैनिकांना केले एक महत्त्वाचे आवाहन
मुंबई / रमेश औताडे
भिमा कोरेगाव विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भिम सैनिक अभिवादनासाठी जातात. या पार्श्वभूमीवर, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी भिम सैनिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.
भिमा कोरेगाव येथे जाताना किंवा परत येताना वढबुद्रक येथे थांबून गोविंद गणपत महार गायकवाड यांच्या समाधीचे आवर्जून दर्शन घ्यावे, असे त्यांनी सांगितले. गोविंद गणपत महार गायकवाड हे सामाजिक न्याय, समता आणि मानवतेसाठी लढणारे महान व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या कार्याचा आणि बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भिमा कोरेगावचा विजय स्तंभ हा केवळ ऐतिहासिक स्मारक नसून तो शोषित-वंचित समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्या स्वाभिमानाच्या लढ्याला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या स्मृती जपणे हे प्रत्येक भिम सैनिकाचे कर्तव्य असल्याचेही नारायण बागडे यांनी नमूद केले. वढबुद्रक येथील गोविंद गणपत महार गायकवाड यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांच्या विचारांना अभिवादन केल्यास भिमा कोरेगावच्या लढ्याचा खरा अर्थ अधिक खोलवर समजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment