वसंतराव त्रिवेदी : आमच्या पत्रकारितेचे खरेखुरे विद्यापीठ !


                                                             
                      योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ 
                    लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत
                              
    साप्ताहिक आहुति च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष लेख  


वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, सहनशक्ती, समरणशक्ती, तंत्रज्ञान, पाककला, पौरोहित्य अशा अनेक गुणांनी संपन्न असे व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव त्रिवेदी होय. वयाच्या बाराव्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या वसंतरावांनी अखेरच्या श्वासापर्यंत 'समाजाय इदम्, न मम' हे तत्व जपलं. निःस्वार्थ, निरपेक्ष पणे समाजाची सेवा केली. कोणताही बडेजाव किंवा स्वार्थ त्यांनी पाहिला नाही. अनेक पदे भूषविली, घेतलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे, नेटाने, आपलेपणाने पार पाडली. जिवंतपणीही आणि मृत्यूनंतरही त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही. सर्वांची सेवा केली, पण कोणाचीही सेवा स्वीकारली नाही. व्रतस्थपणे आयुष्य जगले.  अशा व्रतस्थ कर्मयोग्याच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !
          वसंत मधुसूदन त्रिवेदी ! एक धगधगता अग्निकुंड ! या धगधगत्या अग्निकुंड, यज्ञकुंडात 'समिधा' अर्पण करीत करीत, 'आहुति' देत देत आम्ही घडलो. मधुसूदन माणेकलाल त्रिवेदी आणि पद्मावती मधुसूदन त्रिवेदी या कर्मकांडी मध्यमवर्गीय दांपत्याच्या पोटी वसंत उर्फ विजयकुमार, लक्ष्मीकांत, मदनमोहन, गुणवंतीबेन आणि जितेंद्र ही अपत्ये नंदुरबार येथील देसाईपुरा भागातील निवासस्थानी जन्माला आली. मधुसूदन माणेकलाल त्रिवेदी हे श्रीमाळी ब्राह्मण समाजाचे पहिले वकील. नंदुरबार जवळच्या ढेकवद/खांडबारा येथे त्यांची छोटीशी शेती होती तर पद्मावती मधुसूदन त्रिवेदी यांना वारसाहक्काने नंदुरबार जवळच्या चौपाळे गावात थोडी शेती मिळाली होती. 
             भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. महात्मा गांधी यांची चले जाव चळवळ जोरात सुरु होती. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले होते. नंदुरबार येथे सुद्धा राष्ट्र सेवा दलाच्या युवकांची शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर १९४२ रोजी शाळकरी मुलांची मिरवणूक काढण्यात आली.  शाळकरी वेषातल्या मुली पुढे आणि शालेय गणवेशात असलेली मुले मिरवणुकीत मागे. अशा पद्धतीने मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते. शिरीषकुमार इंजिन आणि वसंत त्रिवेदी गार्ड अशा भूमिकेतून कार्यरत होते. "वसंता, सगळ्या शाळांतून जायचे. तिथे मुख्याध्यापकांना भेटायचे. त्यांना सांगायचे की ब्रिटिशांविरुद्ध विद्यार्थ्यांची स्वयंस्फूर्तीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शाळा सोडा. मुख्याध्यापकांनी ऐकले तर ठीक नाही तर घंटा बडवायची आणि 'वंदे मातरम्' घोषणा द्यायची". शिरीषकुमारचा हा आदेश घेऊन वसंताने आपला मोर्चा सगळ्या शाळांकडे वळवला.
             स्वातंत्र्य आंदोलनाची ती एक वेगळीच ऊर्मी होती. त्यामुळे शाळा सोडण्यात अडचण आली नाही. मिरवणूक घोषणांच्या निनादात निघाली. नंदुरबार येथील माणेक चौकात ब्रिटीश सोल्जरांनी  मिरवणूक अडवली. मिरवणुकीच्या तोंडावर सोल्जरांनी बंदुका सरसावल्या. मुली पुढे होत्या म्हणून शिरीषकुमार तिरंगा ध्वज घेऊन पुढे झेपावत ब्रिटिश सोल्जरांसमोर उभा ठाकला. "अरे, मुर्दाडांसारखे मुलींवर काय बंदुका उगारता. हिंमत असेल तर माझ्या छातीवर गोळ्या झाडा". शिरीषकुमारचे हे उत्स्फूर्त, त्वेषपूर्ण उद्गार ऐकताच ब्रिटीश सोल्जर चेकाळून उठले. मिरवणुकीतील विद्यार्थ्यांनी आणखी जोशात घोषणा द्यायला सुरुवात केली. ब्रिटिश सोल्जर धमक्या देत असूनही विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीत हे पाहून, ब्रिटिश सोल्जरातील एकाने डावा, दुसऱ्याने उजवा हात धरीत तिसऱ्याने समोरुन शिरीषकुमारच्या छातीवर धाडधाड गोळ्या झाडल्या. 'वंदे मातरम्' घोषणा देत शिरीषकुमार धारातीर्थी पडला. सोल्जरांचा धुवांधार गोळीबार सुरु होता. लालदास बुलाखीदास, शशीधर केतकर, घनःश्यामदास शाह हे बालवीर सुद्धा धारातीर्थी पडले. वसंता 'गार्ड' असल्याने तो सर्व शाळा सोडून येईपर्यंत ९ सप्टेंबर १९४२ चे हे आंदोलन अजरामर झाले होते. ही आठवण शेवटच्या श्वासापर्यंत मनात जिवंत ठेवत वसंतराव 'समाजाय इदम न मम' या तत्वाने जगले. 
          आपले इंटरपर्यंतचे शिक्षण वसंत त्रिवेदी यांनी पूर्ण केले. इंटरची परीक्षा रतलाम येथे जाऊन दिली. दुसरीकडे, नंदुरबार येथे सोनारगल्लीत चंदुलाल शंकरलाल त्रिवेदी आणि सौ. बच्चीबेन या दादा गणपती समोर वास्तव्यास असलेल्या शेतकरी-व्यापारी दंपतीला मनोरमा, विनोद, अशोक, नीलम, सुभाष आणि प्रदीप ही अपत्ये झाली होती. त्यापैकी मनोरमा या मोठ्या कन्येसमवेत वसंत उर्फ विजयकुमार यांचा वाङनिश्चय झाला. 
        कर्मठ ब्राह्मण असलेले वकील मधुसूदन माणेकलाल त्रिवेदी हे भारतीय जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते होते तर वसंत त्रिवेदी हे दीनदलित, पददलित, भटक्या, विमुक्त, मागासवर्गीय समाजाची सेवा करण्यासाठी पुढे झेपावलेले. सामाजिक कार्याबरोबरच पत्रकारिता सुद्धा वसंत त्रिवेदी यांनी सुरु केली होती. नंदुरबार येथून पत्नी मनोरमा समवेत निघून धुळे शहर गाठले. धुळ्याला महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब उपाध्ये यांची भेट घेतली. आप्पासाहेब उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हरिजन सेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य सुरु केले. दरम्यानच्या काळात वसंतराव आणि मनोरमाबेन यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता. या चळवळीत त्यांना मधुकरराव धनाजी चौधरी, सौ. कुसुमताई चौधरी, शिवाजीराव गिरिधर पाटील, सौ. विद्याताई पाटील यांचीही साथ लाभली.
         नंदुरबार, धुळे करीत दोंडाईचा येथे वसंतराव कार्यरत झाले. तिथे शंकर गोरख पाटील यांची गाठ पडली. शंकर गोरख पाटील यांच्या 'पडसाद' साप्ताहिकाची जबाबदारी घेतांनाच नाशिकच्या दादासाहेब पोतनीस यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या 'गावकरी' आणि मुंबईच्या पु. रा. बेहेरे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या 'नवशक्ती'ची बातमीदारी सुरू केली. 
         दोंडाईचा येथे दादासाहेब रावळ यांच्या संपर्कात वसंतराव आले. सामाजिक, राजकीय कार्याला आकार मिळत असतांनाच आप्पासाहेब उपाध्ये यांनी वसंत त्रिवेदी यांना थेट अंबरनाथ येथे पाठविले. हरिजन सेवक संघ संचालित समाजविकास मनोरंजन केंद्र आणि सुभाष बालवाडी, अंबरनाथ येथील सुभाषवाडी (वांद्रापाडा) येथे सुरु केली. केंद्र संचालक आणि प्रचारक ही जबाबदारी वसंत त्रिवेदी सांभाळीत होते तर बालवाडीची जबाबदारी सौ. मनोरमा यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. 
              वसंत त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदी यांच्या पोटी योगेश, गिरीश (मुकेश), जयेश आणि तृप्ती ही अपत्ये जन्माला आली. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षात गोळीबारात प्राण वाचले म्हणून पुढचे आयुष्य बोनस समजून 'समाजाय इदम् न मम' हे ध्येय उराशी बाळगून यापुढचे माझे जीवन हे माझे नसून समाजासाठी आहे, या उद्देशाने आपला दिनक्रम आखला. कल्याण जवळील शहाड येथील इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज (आयडीआय) मध्ये नोकरी मिळाली. या कंपनीत काही काळ शॉपकिपर म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना, त्याकाळात तांदूळ जिल्हा बंदी असल्याने कमी प्रमाणात उपलब्ध असे. कंपनीच्या अधिकारी आणि कामगारांना सणासुदीला चांगला तांदूळ आणि अन्न धान्य मिळावे या हेतूने वसंतरावांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेतला. या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केलेले धान्य कंपनीच्या सहकाऱ्याने सोडवून कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात वसंतरावांनी विशेष पुढाकार घेतला होता. 
        ही नोकरी करतांना धरमसी मोरारजी केमिकल कंपनीचे शांताराम वामन नाईक, सेंच्युरी रेयॉनचे  जगदीश दामले, स्वस्तिकचे बाळकृष्ण भट्ट, विम्को कंपनीचे के. एस. पी. नायर या मित्रांचा सहवास लाभला. या मित्रांच्या हाती कल्याण ते अंबरनाथ या परिसरातील शिधावाटप यंत्रणा सोपविण्यात आली होती. या भागातील लोकांची सेवा करता करता दुर्वास ऋषीसारखे रागीट स्वभावाचे वसंत त्रिवेदी यांनी व्यवस्थापनाशी पटले नाही म्हणून नोकरीवर पाणी सोडले. 
           लिखाण, पत्रकारिता याची हौस म्हणून मित्रांच्या आग्रहाखातर ११ जून १९६६ रोजी 'आहुति' हे पाक्षिक सुरु केले नंतर ते अवघ्या सहा महिन्यांत साप्ताहिक झाले. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा सहवास लाभलेल्या वसंत त्रिवेदी यांच्या डोक्यावर समाजवादी चळवळीची टोपी नानासाहेब गोरे यांनी चढवली होती. पण वसंत त्रिवेदी यांचा समाजवाद ढोंगी, तकलादू, आपमतलबी नव्हता. अंबरनाथ येथे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील कंजरभाट, कैकाडी, टकारी, भामटा अशा मागासवर्गीय बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुभाषवाडी येथे आप्पा बडगुजर, लीलाताई कछवाय, सरस्वती कछवाय, कैलास भंडलकर, दीपक परमार अशी मंडळी सोबत घेऊन हे कार्य सुरु होते. सुलोचना गायकवाड बाई, सुनीता चव्हाण यांना समाजविकास मनोरंजन केंद्राच्या शाळेत सोबत घेतले. कालांतराने सुलोचना गायकवाड आणि मग सुनीता चव्हाण यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम केले. मनोरमा त्रिवेदी यांनी सुरुवातीची पाच वर्षे विनावेतन नंतर शंभर, दीडशे रुपये महिना मानधन अशी पंचवीस वर्षे सेवा बजावली.  
        सामाजिक कार्याबरोबरच वसंत त्रिवेदी यांनी दादासाहेब सरदार, डॉ. वि. भि. सरदार, शशिकला सरदार, जगदीश दामले, बाळकृष्ण भट्ट आदींसमवेत समाजवादी पक्षाचे काम सुरु केले. कल्याणचे प्रल्हाद नागेश उर्फ बाबा बेटावदकर, विनायक प्रल्हाद उर्फ अण्णा बेटावदकर, शाम मोहिते, प्रभाकर पाटील, उल्हासनगरमध्ये वासुदेव खानचंदानी, ॲडवोकेट सलामतराय पुरुस्वानी, परळ नायगावचे सुधाकर वावीकर, ठाण्याचे दत्ता ताम्हाणे, सूर्यकांत वढावकर, दशरथ पाटील, वैजनाथ उर्फ बंडू जोशी, भाऊ कदम, वसईचे प्रा. स. गो. वर्टी, डॉमनिक घोन्सालवीस, पंढरीनाथ चौधरी, विलास विचारे, भाई सामंत, भिवंडीचे परशुराम टावरे, जव्हारचे रवींद्र वैद्य, रेवजी भाई चौधरी, काळूराम धोदडे, उद्धवराव कुलकर्णी, पालघरचे गोविंद चिंतामण उर्फ मामा मराठे, सफाळ्याचे ह. म. दीक्षित, मुंबई येथील कृष्णाजी ठाकूर, नारायण तावडे, पालघरचे नवनीत शाह, वासुदेव वर्तक अशा असंख्य समाजवादी कार्यकर्ते, नेते यांच्या मांदियाळी मध्ये सामील झाले. प्रा. मधू दंडवते, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते यांच्या समवेत बैठका होत होत्या. एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, बॅ. नाथ पै, वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे यांचे मार्गदर्शन वरचेवर मिळत होते. 
        १९५४ ते १९६२ पर्यंत सुभाषवाडी येथे वास्तव्य केलेल्या वसंत त्रिवेदी यांनी आपले बिऱ्हाड न्यू कॉलनी येथील रवींद्र भवन मध्ये हलविले. वडिल कर्मकांडी ब्राह्मण असल्याने त्याचा प्रभाव वसंतरावांवर होता. भटक्या विमुक्त समाज बांधवांसाठी वांद्रापाडा (सुभाषवाडी) येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. कालांतराने हा सार्वजनिक श्री गणेशोत्सव क्रांतिवीर क्रीडा मंडळ यानावाने साजरा करण्यात येत होता. रवींद्र भवन येथे जगदीश दामले, चंद्रकांत बाजपेयी, मोतीलाल तांबोळी, लक्ष्मणराव देशपांडे, निंबाळकर, वाघ असे अनेक शेजारी लाभले. श्री गुरुदेव दत्त यांचे गुरुचरित्राचे सातत्याने वाचन सुरु होते. श्री गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती घरी साजरी करण्यात येत असे. 
        याच दरम्यान अंबरनाथ येथील ज्येष्ठ राजकीय नेते, स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम वासुदेव उर्फ भाऊसाहेब परांजपे यांनी प्राचीन शिवमंदिरामागील भागात धरमसी मोरारजी केमिकल कंपनीतील कामगारांसाठी मोठी चाळ उभारली. ही चाळ पुढे परांजपे चाळ म्हणून ओळखण्यात येऊ लागली. भाऊसाहेब परांजपे हे सुरुवातीला त्याच विभागात वास्तव्यास होते. भाऊसाहेबांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई या दत्त भक्त होत्या. त्यांच्या आग्रहाखातर भाऊसाहेबांनी त्यांच्या घराला लागून श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिर स्थापन केले. लक्ष्मीबाईंच्या पश्चात या मंदिरासाठी भाऊसाहेब परांजपे यांना विश्वासू व्यक्ती हवी होती. त्यांनी शांताराम वामन नाईक यांच्या कानी हे घातले. त्यावर नाईक मास्तर म्हणाले, अहो भाऊसाहेब, आपला वसंत त्रिवेदी आहे की, तो जबाबदारी सांभाळेल, असे नाईक मास्तरांनी सांगताच भाऊसाहेब भडकले. अरे तो तर पक्का  समाजवादी. तो कुठे देव बीव मानतो, असे भाऊसाहेब म्हणताच नाईक मास्तरांनी सांगितले की, भाऊसाहेब खरे आहे तुमचे, पण तो ढोंगी समाजवादी नाही. श्री गुरुचरित्राचा एक अध्याय वाचल्या शिवाय तो घरा बाहेर पडत नाही, असे नाईक मास्तरांनी सांगताच भाऊसाहेब तयार झाले. त्यांनी वसंत त्रिवेदी यांना बोलावणे धाडले.
         राजकीय क्षेत्रात परस्परविरोधी असलेले परांजपे त्रिवेदी समोरासमोर आले. वसंतराव, मी तुम्हाला चांगले घर बांधून देतो. तुम्ही दत्त मंदिराची जबाबदारी सांभाळा, असे भाऊसाहेब परांजपे यांनी सांगताच, आहे ती जागा चालेल. बांधून देण्यात वेळ घालवू या नको, असे वसंतरावांनी भाऊसाहेबांना सांगितले. आणि मग वसंत त्रिवेदी यांचे बिऱ्हाड १९६९ सालच्या धनत्रयोदशी ला परांजपे चाळीत वास्तव्यास आले. त्याकाळात त्या परिसरात ना पाणी, ना रस्त्यावर वीज, ना योग्य ते रस्ते, ना सार्वजनिक स्वच्छता अशा परिस्थितीत वसंतराव त्रिवेदी कुटुंब परांजपे चाळीत वास्तव्यास आले. चाळीवर येऊन या सगळ्या पायाभूत सुविधा वसंतरावांनी आपल्या कौशल्याने करवून घेतल्या. जानेवारी ते जून या काळात त्या विभागात पाण्याची तीव्र टंचाई भासत असे. चाळीतील सर्व रहिवासी शिवमंदिराजवळील कुंडावर पाणी भरायला जात असत. अंघोळ, भांडी, कपडे धुण्यासाठी वालधुनी नदीचा उपयोग करीत असत. या परिस्थितीत वसंतराव त्रिवेदी हे सुरुवातीला नगरपालिकेकडून पाण्याचे टँकर मागवित असत. ते पाण्याचे टँकर सहा पुरुष खोल विहिरीत रिकामे करण्यात येत असत. त्यातून चाळीतील रहिवासी पाणी घेत असत. कालांतराने सार्वजनिक नळांची सुविधा करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छता गृह नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले.  
          या सार्वजनिक कामातून परांजपे चाळीतील सर्व रहिवासी बांधवांचा घरगुती संबंध जोडला गेला. याच चाळीत वास्तव्यास असलेले आणि धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत काटा मास्तर म्हणून कार्यरत असलेले श्री. कृष्णाजी विश्वनाथ केतकर उर्फ भाऊसाहेब केतकर यांच्या समवेत संपर्क झाला आणि मग काय हा आध्यात्मिक अवलिया त्रिवेदी कुटुंबांचा महत्वपूर्ण घटक बनला. दरम्यान, योगेश, गिरीश, तृप्ती यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होत आले. जयेश हा नंदुरबार येथे मधुसूदन माणेकलाल त्रिवेदी या आपल्या आजोबांकडे लहानाचा मोठा झाला. 
         साप्ताहिक आहुति कल्याणच्या गोखले यांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये, ठाण्याला स. पां. जोशी, गोपाळराव फडके, अंबरनाथ येथील विविध छापखान्यांत छापून घेत. एक अकल्पनीय घटना घडली आणि वसंत त्रिवेदी यांनी स्वतः छापखाना काढण्याचा निर्णय घेतला. या दृष्टीने योगेश, गिरीश आणि जयेश यांना मुद्रणकलेत पारंगत केले. ३ जून १९७३ रोजी वसंत त्रिवेदी यांनी मनोरमा मुद्रण सुरु केले.  आधी अक्षरजुळणी, मग छपाई यंत्र असि टप्प्या टप्प्याने छापखाना पूर्ण उभा राहिला. यासाठी महाराष्ट्र बॅंकेचे बापट, गावकरीचे दादासाहेब पोतनीस, पुण्याच्या राजहंस, यशवंतराव चव्हाण यांची न्यू भारत टाईप फाऊंड्री, बँक ऑफ इंडियाचे राजे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कर्जाच्या ओझ्याखाली सातत्याने राहून वसंत त्रिवेदी यांनी आहुति आणि मुद्रणालय चालविले. 
        १९७५ साली जून महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंत त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृती धारक पत्रकार, योगेश चर्नीरोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात. अशावेळी पत्नी सौ. मनोरमा, पुत्र योगेश व गिरीश यांच्या मदतीने वसंतरावांनी भूमिगत चळवळ राबविण्याचे शिवधनुष्य उचलले. साप्ताहिक आहुति मधून आणीबाणीचे गुणगान करायचे आणि दुसऱ्या बाजूला भूमिगत चळवळ राबवितांना लोकनायक जयप्रकाश नारायण, मृणाल गोरे, बाळ दंडवते यांची पत्रके छापून, गठ्ठे बनवून, ती पहाटे पहाटे लोकलने कांजूरमार्ग, करी रोड, चिंचपोकळी आदी ठिकाणी फलाटांवर फेकून यायचे. तीच पत्रके संपादक आहुति म्हणून पोस्टाने पुन्हा वसंतरावांच्या घरी येत असत. ठाण्याचे ज्येष्ठ कामगार नेते मधू जोशी हे अठरा महिने भूमिगत होते. ते मुक्कामाला वसंत त्रिवेदी यांच्या घरी असायचे. काही वेळा तर अंगावर ताप असूनही ते सात अकराचे ट्रेडल मशीन चालवायचे.       
         आणीबाणी उठली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती आंदोलन यशस्वी झाले. मोरारजी देसाई यांची संघटना कॉंग्रेस, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष आणि भारतीय लोकदल अशा चार पक्षांचा जनता पक्ष तयार करण्यात आला. कॉंग्रेसच्या तरुण तुर्क चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत यांनीही जनता पक्षात हिरीरीने भाग घेतला. इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. भारतीय लोकदलाच्या नांगरधारी शेतकरी या निवडणूक चिन्हावर जनता पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुका लढविल्या. देशभरात जनता पक्षाची बांधणी सुरु झाली. 
          वसंत त्रिवेदी यांची ठाणे जिल्हा जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. साथी दत्ता ताम्हाणे या बुजूर्ग नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित मावळहून आलेले रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ उपलब्ध करून दिला. १९७७ साली जनता पक्षाची लाट आली होती आणि रामभाऊ म्हाळगी हे ठाणे मतदार संघातून सहज निवडून आले. 
          १९७८ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. चार पक्षांचा जनता पक्ष जरी झाला असला तरी तो एकजिनसी होऊ शकला नाही. परिणामी अंबरनाथ मतदार संघातून आम्हाला जरी उमेदवारी दिली नाही तरी चालेल पण वसंत त्रिवेदी यांना उमेदवारी देऊ नका अशा प्रकारच्या भूमिका पक्षातील संघीष्ट नेत्यांनी घेतल्या. त्यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या १३ जागा होत्या. वसंत त्रिवेदी हे जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असले तरी ते पत्रकार असल्याने त्यांनी जी. जी. पारीख, बी. ए. देसाई, प्रभुभाई संघवी या पक्षनिरीक्षकांकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे चित्र उभे केले. मला उमेदवारी दिली नाही तरी मी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी काम करीन, अशी निःसंदिग्ध ग्वाही वसंत त्रिवेदी यांनी निरीक्षकांना दिली. या संधीचा लाभ घेत वसंतरावांच्या सहकाऱ्यानी वसंतरावांचा पत्ता कापला. आबासाहेब पटवारी हे डोंबिवलीचे नगराध्यक्ष आणीबाणीच्या काळात तुरुंगात असल्याने उपनगराध्यक्ष असलेल्या जगन्नाथ शिवराम पाटील यांना अंबरनाथ मधून उमेदवारी दिली गेली. त्यांना निवडून आणण्यासाठी वसंत त्रिवेदी यांनी अथक परिश्रम घेतले.
         प्रा. रामचंद्र गणेश ऊर्फ रामभाऊ कापसे यांनी ठाणे जिल्हा जनता पक्षाच्या एका बैठकीत आहुति साप्ताहिकाला जनता पक्षाचे मुखपत्र करण्याची सूचना केली होती. त्यावर मी पक्षाचा असलो तरी माझे आहुति साप्ताहिक कोणत्याही पक्षाला वाहून घेणार नाही, ते निष्पक्षच राहील, अशी परखड भूमिका वसंतरावांनी मांडली. १९६९ सालापासून १९९६ पर्यंत वसंत त्रिवेदी हे भाऊसाहेब परांजपे चाळीत वास्तव्यास होते. या कालावधीत वसंत त्रिवेदी यांनी इतिहासाची अनेक पाने लिहिली किंबहुना इतिहासातील अनेक घटनांचे ते एक महत्वपूर्ण घटक बनले.
       भाऊसाहेब परांजपे यांच्या श्री दत्त मंदिरात सेवेसाठी वसंत त्रिवेदी यांनी आपले बिऱ्हाड न्यू कॉलनीतून प्राचीन शिवमंदिराजवळ स्थलांतरित केले. वर्षभरात या भाऊसाहेब परांजपे चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना सार्वजनिक जीवनात काहीतरी करावेसे वाटावे अशी परिस्थिती निर्माण केली. साधारणपणे एका वर्षानंतर भाऊसाहेब परांजपे यांनी फडणीस या उद्योजकांना तेथील जागा विकली ज्यात श्री दत्त मंदिर पण समाविष्ट होते. याच भाऊसाहेब परांजपे चाळीत राहणारे एक अध्यात्ममार्गी आवलिया श्री. कृष्णाजी विश्वनाथ केतकर उर्फ भाऊसाहेब केतकर यांच्या बरोबर वसंत त्रिवेदी यांचा संबंध आला. भाऊसाहेब केतकर हे दत्त भक्त आणि त्यांच्या एकाच खोलीत श्री दत्ताचे छोटे मंदिर होते. भाऊसाहेब केतकर यांच्या घरी दर गुरुवारी भाविक येत असत. भाऊसाहेबांनी सकाळी केलेला स्वयंपाक त्यांना ग्रहण करायला दुपार होत असे. 
         भाऊसाहेब केतकर यांचे कुटुंब वसई विरार जवळच्या आगाशी गावात रहात असे. मनोरमा कृष्णाजी केतकर, शशी (सुजाता जोग), प्रकाश, शैला, सुहास, देवयानी ही भाऊसाहेब केतकर यांची चार अपत्ये. पण नोकरी आणि अध्यात्म यासाठी केतकर हे अंबरनाथ येथे वास्तव्यास होते. वसंत त्रिवेदी यांनी भाऊसाहेब केतकर यांची ही तारेवरची कसरत पाहिली आणि स्वतः रहात असलेल्या दोन खोल्यांची जागा त्यांना दिली. स्वतः शेजारच्या दोन खोल्यांच्या जागेत स्थलांतरित झाले. हळूहळू बाजूच्या दोन खोल्यांमध्ये मनोरमा मुद्रण सुरु केले. योगेश, गिरीश आणि तृप्ती यांचे शिक्षण पूर्ण होत आले आणि योगेश व गिरीशला मुद्रण कलेत पारंगत केले. ११ जून १९६६ ला सुरु केलेल्या आहुति साप्ताहिकाचा व्याप/पसारा वाढू लागला. अंकाची छपाई, त्याच्या घड्या घालून त्यांचे टपालाने वितरण, वाचकांना वितरण ही कामे वसंत त्रिवेदी यांचा परिवार करीत होता. त्यांच्याकडे येणारे नातेवाईक सुद्धा या कामाला हातभार लावीत असत.
         नंदुरबार येथून शिक्षण पूर्ण करुन जयेश हा सुद्धा पुनश्च अंबरनाथ येथे आपल्या परिवारात आला होता. तो सुद्धा मुद्रणकलेत पारंगत झाला. यंत्राचे सर्व भाग वेगवेगळे करुन पुनश्च यंत्र जसेच्या तसे बनविण्याचे कसब जयेशने अंगी बाणले. वसंत त्रिवेदी यांनी नौकरी सोडल्यामुळे आहुति साप्ताहिकाच्या सह पाच अपत्ये यांचा परिवार, चरितार्थ चालविणे ही बाब अत्यंत कठीण बनली होती. मनोरमा वसंत त्रिवेदी या भाऊसाहेब परांजपे चाळीतून अंबरनाथ पूर्वेकडून पश्चिमेकडे सुभाषवाडी येथे पायी जाऊन केवळ दीडशे रुपयांवर नौकरी करुन घर चालविण्यासाठी खटाटोप करीत होत्या. 
     १९७२ साली योगेश जुनी अकरावीची परीक्षा देऊन मुलुंड येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर म्हणजे मुद्रण यंत्रचालकचे प्रशिक्षण घेऊ लागला. गिरीश मुंबई येथे रायचंदशेठ मैशेरी यांच्या छापखान्यात नौकरी करीत तर जयेश रीक्षा चालवून हातभार लावीत होता. तृप्ती आई वडिलांना मदत करीत होती.
        पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, अध्यात्म अशा क्षेत्रात चौफेर अशी वसंत त्रिवेदी यांची घोडदौड सुरु होती. दरम्यान, भाऊसाहेब परांजपे यांनी आपल्या चाळीच्या खोल्या काही लोकांना विकल्या. वसंत त्रिवेदी, भाऊसाहेब केतकर, रामचंद्र जोगळेकर यांच्या पाच खोल्यांची चाळ शांताराम वामन नाईक यांनी विकत घेतली. बाजूला रामचंद्र पाठक, शरद पाठक, अनिल पाठक यांनी दोन दोन खोल्यांची जागा घेतली. तिनही पाठकांनी छोटेखानी बंगले बनविले मध्ये जयंतराव लेले हे शुभांगी या पत्नी आणि आनंद या मुलासह कानसई विभागातून येऊन स्थायिक झाले. शरद आणि शर्मिला पाठक आणि त्यांच्या सुजाता, संगीता, राखी या कन्यका, रामचंद्र आणि शीला पाठक व त्यांच्या छाया, स्मीता, वृषाली, ज्योती, रुपाली या कन्यका तसेच अनिल व रोहिणी आणि त्यांची श्रद्धा ही कन्या असा परिवार या चाळीत रहात होता. या पैकी रामचंद्र पाठक यांची कन्या वृषाली बरोबर जयेशचा प्रेमविवाह ठरला. मोठी भावंडे लग्नाची बाकी होती म्हणून तो विवाह योगेशच्या विवाहानंतर करण्यात यावा, असे ठरले. 
      दरम्यान, सुरत येथील भास्करभाई आणि सौ. इंदिराबेन त्रिवेदी यांचे ज्येष्ठ सुपूत्र नरेश यांच्या समवेत १९८४ साली १७ डिसेंबर रोजी तृप्तीचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. त्यांच्या शिफारशीनुसार चंद्रवदन वामनराव ओझा आणि सौ. चतुराबेन यांची द्वितीय कन्या माया हिचे योगेश साठी स्थळ चालून आले.  ११, १३ आणि २३ मार्च १९८६ या तीन तारखांना विविध परिस्थितीत योगेश मायाचा विवाह संपन्न झाला. मग जयेश आणि वृषाली यांचा विवाह सोहळा झाला. पुणे येथील गंगाधरपंत आणि मीनाताई मुळे यांची कन्या मनिषा हिच्या समवेत गिरीश उर्फ मुकेशचा विवाह संपन्न झाला. 
      अंबरनाथचे प्रख्यात समाजसेवक, माजी नगराध्यक्ष प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेब नलावडे यांचे राजकीय मतभेद असले तरी पत्रकार या नात्याने वसंत त्रिवेदी यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यातूनच वि. ना. भागवत गुरुजी यांचा वसंत त्रिवेदी यांच्या बरोबर परिचय झाला. आणि भागवत गुरुजी हे त्रिवेदी परिवाराशी जोडले गेले. जयंतराव लेले यांचा परिवार सुद्धा आहुति परिवाराचा एक घटक बनला. भाऊसाहेब केतकर यांच्या बरोबर कधी वसंत त्रिवेदी कधी गिरीश तर कधी योगेश दौऱ्यावर असत. गिरीश तर तब्बल एक तप भाऊसाहेब केतकर यांच्याकडे होता. 
        माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे निकाल पूर्वी वर्तमानपत्रात येत असत. ठाणे जिल्ह्यातील स. पां. जोशी यांच्या सन्मित्र आणि वसंत त्रिवेदी यांच्या आहुतिकडे हे निकाल मिळत असत. पंधरा दिवस आधी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची छापील यादी आहुतिकडे येत असे. अंबरनाथच्या सर्व विद्यर्थ्यांची नांवे कंपोज करुन ठेवली जाई आणि निकालाच्या आदल्या दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नांवे छापली जात. सुरुवातीला तर हा निकाल कल्याणला मोहन प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून योगेश आणि गिरीश कल्याण रेल्वे पुलावर आहुति अंक विक्रीसाठी उभे रहात. मग परांजपे चाळीतून हा निकाल देण्यात येत असे. तेंव्हा मुले आणि पालकांची झुंबड उडत असे. 
        वसंत त्रिवेदी यांनी कृ. वि. तथा नाना पेठे, भैय्यासाहेब सहस्रबुद्धे, गो. ना. सोहोनी, मधुकर उपासनी, दामुभाई ठक्कर, विजय वैद्य, रविंद्र वैद्य आदी पत्रकारांना सोबत घेऊन ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका निभावली तसेच सोलापूरचे रंगा अण्णा वैद्य, धुळ्याचे कांतीलाल गुजराती, फलटणचे हरीभाऊ निंबाळकर, रविंद्र बेडकिहाळ, धुळ्याचे भाई मदाने, परळचे कुमार कदम, नाशिकचे दादासाहेब पोतनीस, चंदुलाल शाह, पुण्याचे वसंत काणे, नांदेडचे कृष्णाजी शेवडीकर, अमरावती चे बाळासाहेब मराठे, नांदेडच्या सूर्यकांता पाटील, अलिबाग च्या मीनाक्षी पाटील आदी समवेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वाढीसाठी कंबर कसली. ठाणे जिल्हा पत्रकार संघात विजय वैद्य यांच्या समवेत योगेश अहमहमिकेने भाग घेत असे. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत कार्यरत राहतांना महाराष्ट्राबाहेरील पत्रकारांना त्यात सहभागी करुन घेण्यासाठी वसंतरावांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राबाहेरील राज्यात असलेल्या मराठी पत्रकारांना अखिल भारतीय पत्रकार परिषद या संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी वसंतराव त्रिवेदी यांनी राज्याबाहेर दौरे सुरु केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन मध्य प्रदेश मध्ये इंदोर आणि नवीदिल्ली येथील पत्रकर या संघटनेत सक्रिय झाले. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा संघटना या संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. परिषदेच्या कार्यकारिणीत सदस्य, सरचिटणीस अशी पदे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 
    ठाणे वैभवचे संस्थापक संपादक नरेंद्र बल्लाळ, दैनिक सन्मित्र चे संस्थापक संपादक स. पां. जोशी आणि वसंतराव त्रिवेदी हे ठाणे जिल्हा पत्रकार भवन समितीचे सदस्य होते. नरेंद्र बल्लाळ हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष झाले. त्यावेळी वसंतराव त्रिवेदी हे या संघटनेचे सरचिटणीस होते. त्याकाळात ठाणे जिल्ह्यात या संघटनेचे अधिवेशन ठाणे येथील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस भरणाऱ्या या अधिवेशनाची मोठ्या उत्साहात भव्य प्रमाणात तयारी करण्यात आली होती. सुधारकांच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून सातारा येथून सुधारक ज्योत आणण्यात आली होती. या ज्योतीचे ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर जिल्हा पत्रकार संघातर्फे सायकलपटूंनी स्वागत करण्याचे निश्चित झाले होते. दुर्दैवाने त्याच दिवशी ठाणे येथे दुःखद घटना घडल्याने ठाण्यातील वातावरण तंग झाले होते. तरीही शासन आणि प्रशासनाने पत्रकारांच्या अधिवेशनासाठी सहकार्य केले होते. मात्र वातावरण पाहून नरेंद्र बल्लाळ आणि वसंत त्रिवेदी यांनी अधिवेशन एक दिवस चालवले. 
    महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अधिक चिघळत चालला होता. खासदार राज्यसभा सदस्य सतीश प्रधान आणि शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ यांनी वेषांतर करून बेळगावात जाऊन आंदोलन केले. त्याच वेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने नरेंद्र बल्लाळ आणि वसंत त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून असंख्य पत्रकार मिरजेत दाखल झाले. नरेंद्र बल्लाळ, वसंतराव त्रिवेदी, राजाराम माने, दयानंद मुकणे, गिरीश त्रिवेदी, दामूभाई ठक्कर, उद्धवराव कुलकर्णी आदी ठाणे जिल्ह्यातील पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. मिरज येथून सर्वजण रेल्वेने बेळगाव शहरात दाखल झाले तेथे हनुमान मंदिरात स्थानिक पत्रकार आणि बेळगावातील महाराष्ट्र कर्नाटक सीमा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभा आयोजित केली होती. त्यासभेत पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली होती.    
राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्षाचे कार्य वसंत त्रिवेदी यांनी जोमाने सुरु ठेवले होते. 
        साने गुरुजी कथामालेच्या कामात वसंतरावांनी झोकून देऊन काम केले. अंबरनाथमधील सर्व शाळांमध्ये वसंतरावांनी साने गुरुजी कथामालेच्या शाखा सुरु केल्या होत्या. "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे . . " ही कविता सर्व शाळांमधून बसवून घेतली होती. साने गुरुजी कथामालेच्या एक कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंतरावांनी अंबरनाथमधील सर्व भाषिक शाळांमध्ये जाऊन सहा भाषेत ही प्रार्थना बसवून घेतली होती. एका सुरात, एका तालात, सहा भाषेत ही प्रार्थना सामुदायिक पठण करून वसंतरावांनी एक विक्रम केला होता. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.   
       नवशक्ती या वर्तमानपत्रात योगेश १९७५ ते १९७८ या दरम्यान वसंत त्रिवेदी यांच्यासाठी बातमीदारी करीत आणि महिन्याला १० रुपये टपालखर्च मिळत असे. १९७५ ते १९७८ या काळात योगेशने चर्नीरोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात मोनो कास्टींग मशीन ऑपरेटरचे प्रशिक्षण घेतले. १९७९ साली अंबरनाथ येथील स्वस्तिक हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज मध्ये योगेश नोकरीला लागला. मनोरमा मुद्रणचा विस्तार होऊ लागला. गृह आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या हस्ते मोठ्या छपाई यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने नगराध्यक्ष प्रभाकर नलावडे यांनी शिवमंदिर ते परांजपे चाळ या दरम्यान एका दिवसात चांगला रस्ता उपलब्ध करून दिला.  
       १९८० च्या दशकात वसंतराव त्रिवेदी यांच्या आयुष्यात आणखी दोन महत्वपूर्ण घटना घडल्या. वसंतराव त्रिवेदी यांच्या भगिनी गुणवंतीबेन यांचा सुपूत्र सुरेशचंद्र हा परिवारापासून दूर होता तो अंबरनाथ येथे अचानक वसंत त्रिवेदी यांच्या घरी आला. तृप्तीला वाटले की योगेशचा कुणी मित्र असावा म्हणून तिने त्याला, या बसा म्हणत सुरेशचे स्वागत केले. इतक्यात आतून मनोरमाबेन बाहेर आल्या. पाहतो तर अरे सुरेश ? कधी आलास ? अरे हा तर तुमचा आतेभाऊ ! असं मनोरमाबेन यांनी सांगत परिचय करुन दिला. मामा, मामी आणि मामेभाऊ, मामेबहीण असे कुटुंबीय सुरेशला भेटले. सुरेश उच्च विद्या विभूषित आणि गिरगांव प्रार्थना समाज भागात सर हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये लेखा विभागात नोकरी करीत होता. सुरेश हा वसंत त्रिवेदी यांच्या परिवारात सहभागी झाला. अंबरनाथ येथील स्वस्तिक कंपनीच्या भांडार विभागात बाळकृष्ण भट्ट यांच्या सोबत अरुणभाई पंड्या काम करीत होते. त्यांच्या विद्याविहार घाटकोपर येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील श्री. मनसुखलाल अमृतलाल रावळ आणि सौ. तारामती मनसुखलाल रावळ यांच्या अरुणा आणि मीना या दोन कन्या पैकी अरुणा या मोठ्या कन्येचा विवाह अरुणभाई पंड्या यांच्या समवेत झाला होता. स्वस्तिक कंपनीच्या पॅक आर्ट मध्ये योगेश हा प्रिंटिंग सुपरवाईझर म्हणून कार्यरत होता. बाळकृष्ण भट्ट, अरुणभाई पंड्या यांच्या मार्फत योगेशकडे निरोप देण्यात आला. अरुणाबेनची लहान बहीण मीना या सुशील, सुस्वभावी कन्या हिचे शुभमंगल सुरेश यांच्या समवेत यथासांग पार पडले.  
       वसंत त्रिवेदी यांना सामाजिक, राजकीय कार्याबरोबरच धार्मिक, अध्यात्मिक पार्श्वभूमी असल्याने आणि सामवेदी श्रीमाळी ब्राह्मण असल्याने वसंत त्रिवेदी यांनी 'सामवेदीय कार्यपद्धती' नावाची एक पोथी लिहिली. प्रात:संध्या, मध्यान्ह संध्या, सायं संध्या, सामश्रावणी, आदी विविध पूजाविधी, श्री दत्तबावनी यांचा समावेश या पोथीमध्ये असून देवनागरी लिपी आणि गुजराती भाषेतील या पोथीचे नंदुरबार येथे श्री. अनिरुद्ध शास्त्री त्रिवेदी यांच्या शुभहस्ते श्रीमाळी ब्राह्मण समाजवाडी मध्ये समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. याच पोथीचे मुंबई मध्येही महाराष्ट्राचे मंत्री श्री. हसमुखभाई उपाध्याय यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. 
       वसंत त्रिवेदी हे स्वतः खवैय्ये होते. स्वतः करून सोबतच्यांना चांगले चांगले पदार्थ खाऊ घालायची त्यांची सवय होती. स्वयंपाक करण्यात ते 'मास्टर शेफ' होते. परांजपे चाळीत असतांना कोजागिरी पौर्णिमा असो की हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी असो. चाळीतील सर्वांसाठी भेळ करून ठेवायचे आणि रात्री उशिरा सर्वाना बरोबर घेऊन थट्टा मस्करी करत उत्साहात साजरा करायचा त्यांचा हातखंड होता. डाळ बट्टी करण्यात त्यांचा हात क्वचित कोणी धरू शकत. घरी कोणी पाहुणे आली की स्वतः अंगणात गोवऱ्या रचून भट्टी तयार करायचे. कणिक मळून बट्ट्या तयार करून त्या चांगल्या भाजायचा आणि खाऊ घालायच्या. बट्ट्या केल्या की जाणून बुजून जास्त करायच्या मग दोन दिवस आम्हा मुलांना वेगळी मेजवानी असे.  
    वसंतराव जसे आचारी म्हणजे स्वयंपाकी होते तसेच ते उत्कृष्ट आचार्य अर्थात भिक्षुकी सुद्धा करू शकत असत. चाळीत कोणाकडे श्री गणेश पूजन अथवा सत्यनारायण पूजा करायची असेल आणि कोणी गुरुजी उपलब्ध नसले की वसंतराव स्वतः सोवळे नेसून पूजा सांगायला हजर होत ते सुद्धा विना दक्षिणा. हरतालिका पूजन आणि ऋषी पंचमी ही चाळीतील महिलांना म्हणजे एक पर्वणीच असे. घरातील आणि चाळीतील सर्व महिलांना  दोन्ही पूजा विधिवत सांगून करवून घ्यायचे. कोणती पूजा कधी आणि का करायची त्याचा सविस्तर अर्थ वसंतराव सांगायचे. ऋषी पंचमीला तर महिलांसमवेत ऋषी चा स्वयंपाक करून तोच स्वयंपाक ते सुद्धा खायचे. 
         सामवेदी श्रीमाळी ब्राह्मणांची श्रावणी ही बहुतेक हरितालिका किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच असायची. हा श्रावणीचा कार्यक्रम म्हणजे आम्हा कुटुंबियांचा एक उत्सवच असायचा. श्रावणीच्या आदल्यादिवशीच पूजेची सर्व तयारी वसंतराव करायचे. म्हणजे केवळ पूजेसाठी साहित्यच नव्हे तर त्यानंतर लागणाऱ्या नैवेद्याची तयारी सुद्धा वसंतरावच करायचे. मग श्रावणीच्या दिवशी वालधुनी नदीवर शिवमंदिराच्या जवळ सर्वाना घेऊन जायचे. त्या नदीच्या वहात्या पाण्यांत सर्वांच्या विधिवत अंघोळ व्हायच्या. अंघोळ करायचे आणि मग दत्त मंदिरात जमून विधिवत जानवे बदलायचे कार्यक्रम झाल्यावर आमचा अनोखा रक्षा बंधनाचा कार्यक्रम व्हायचा. त्या आठवणी आजही सर्वांच्या मनात कायम घर करून आहेत.   
       १९७७ साली  ठाणे लोकसभा मतदारसंघातून जनता पक्षातर्फे निवडून आलेले रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी यांचे देहावसान झाले. १९८० साली जनता पक्षातून भारतीय जनसंघाचे नेते व कार्यकर्ते बाहेर पडले आणि ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. १९८२ साली ठाणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. जनता पक्षाचे उमेदवार दत्ता ताम्हाणे होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगन्नाथ शिवराम पाटील होते. या पोटनिवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ठाणे जिल्हा जनता पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने  वसंत त्रिवेदी यांच्या खांद्यावर होती. शहाद्याचे पी. के. अण्णा पाटील आणि महाराष्ट्र जनता पक्षाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील यांच्या दोन जीप तसेच सहा रिक्षा वसंत त्रिवेदी यांच्या अंगणात ठाण मांडून होत्या. प्रचाराची रणधुमाळी जोरदार होती. संपूर्ण मतदार संघ धुंडाळून काढला. 
      या दरम्यान राजारामबापू पाटील यांच्या जीपला अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान रात्री अपघात झाला. योगेश, अप्पा कुलकर्णी, मधुकर भोईर. आदी जखमी झाले. कानसई येथील  डॉ. अशोक चौधरी यांच्या दवाखान्यात उपचार करुन दोघांना घरी पाठविण्यात आले. परंतु योगेश जास्त जखमी झाला असल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मृणाल गोरे, प्रमिला दंडवते योगेशला पाहण्यासाठी, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्वतः अंबरनाथ येथे धावले. अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा निकाल विरोधात गेला होता. 
         १९८४ साली सहकाऱ्यावरील अन्यायामुळे स्वस्तिकची नौकरी योगेशने  सोडून दिली. १९८५ ते १९८८ या काळात आत्माराम सावंत संपादक असतांना माधव गडकरी यांचे मेहुणे रमेश गुप्ते यांच्या आग्रहाखातर योगेशने मुंबई सकाळचा वार्ताहर म्हणून काम केले. अंबरनाथ ते कल्याण पर्यंत सायकलीवरून त्याने बातमीदारी केली. १९८८ साली  वसंत त्रिवेदी यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात बसलेले असतांनाच विजय वैद्य धावत आले आणि लोकसत्तामध्ये आलेल्या जाहिराती प्रमाणे अर्ज करुन टाक असे योगेशला सांगून गेले. योगेशने अर्ज केला. परीक्षा दिली आणि सामनाचे मुद्रक प्रकाशक सुभाष देसाई यांचे पत्र आले. १५ डिसेंबर १९८८ रोजी शिवसेना भवन येथे बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखती साठी बोलावले होते. तेथून मातोश्री येथे जाऊन सामना चे संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत घेऊन उपसंपादक वार्ताहर म्हणून नियुक्ती केली. गिरीश मुंबई येथे नौकरीला असल्याने आहुतिची जबाबदारी त्याने घेतली तरच हे शक्य होते. गिरीशने आहुति साठी मुंबई येथील नोकरी सोडली. आहुतिच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा वसंत त्रिवेदी यांनी योगेश कडून गिरीशला सोपविली. 
        योगेशकडे आधी मुंबई महापालिका व नंतर मंत्रालय आणि विधिमंडळ यांच्या वृत्तांकनाची जबाबदारी असल्याने राजकीय क्षेत्रात ओळखी वाढू लागल्या. १९९० च्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील सभांसाठी संजय डहाळे आणि योगेश त्रिवेदीकडे कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांनी जबाबदारी दिली होती. परिणामी निवडणूक निकालानंतर निवडणूक याचिकांच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात अंबरनाथ येथून साक्षीसाठी योगेशला जावे लागत असे.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव धनाजी उर्फ बाळासाहेब चौधरी यांचे वसंतरावांशी कौटुंबिक संबंध असल्याने आहुतिच्या रौप्यमहोत्सवी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभासाठी बाळासाहेब चौधरी, विरोधी पक्षनेते मनोहर जोशी, आमदार साबिरभाई शेख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, रामभाऊ कापसे यांना आमंत्रित करण्यात आले. १४ जून १९९२ रोजी अंबरनाथ येथील वडवली विभागातील कल्याण केंद्रात सकाळी कार्यक्रम दणदणीत पणे संपन्न झाला. या कार्यक्रमापूर्वी सकाळी ९ वाजता दूरदर्शनवर चाणक्य ही मालिका बाळासाहेब चौधरी यांना पहायची होती. जयंतराव लेले यांच्या निवासस्थानी ती सुविधा उपलब्ध करण्यात आली. ही मालिका पाहून मग सर्व प्रमुख पाहुणे प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी गेले. मंदिरात गेल्यावर त्या पाहुण्यांनी या मंदिराबाबत माहिती असलेली पुस्तिका, छायाचित्रे आहेत का असे विचारल्यावर सर्वानी नकारात्मक उत्तर दिले. त्याच वेळी वसंतराव त्रिवेदी यांनी आहुति चा शिवमंदिर विशेष अंक काढायचे आदेश दिले. त्या प्रमाणे ९ मार्च १९९४ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शुभहस्ते मुंबई येथील मातोश्री येथे आहुति शिवमंदिर विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी वसंतराव त्रिवेदी हे पत्रकार परिषदेच्या कामानिमित्त दौऱ्यावर असल्याने मातोश्री येथे उपस्थित राहू शकले नव्हते. 
        योगेश सामना मध्ये उपसंपादक असल्याने त्याचा उपयोग त्याने अंबरनाथ येथील विविध विकास कामांसाठी करुन घेतला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पर्यटन केंद्र, अंबरनाथची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जोखडातून सुटका, अंबरनाथ तालुका निर्मिती, महापालिका आयुक्तांच्या हातून शिवदर्शन बंगला मुक्त करणे, ही महत्वपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आमदार आणि नंतर कामगार मंत्री झालेले साबिरभाई शेख आणि धर्मवीर आनंद दिघे यांची साथसोबत महत्वाची ठरली.
     डॉ. मनोहर जोशी यांनी या निमित्ताने अंबरनाथ येथे बऱ्याच वेळा भेटी दिल्या. योगेश सामना मध्ये नौकरी करणे हे वसंत त्रिवेदी यांना तसे पटले नव्हते. अर्थात ११ जून १९६६ रोजी सुरु झालेल्या आहुतिने १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेल्या शिवसेनेला भांडवलदारी वृत्तपत्रांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर वसंत त्रिवेदी यांनी या शिवसेनेचे आहुतिच्या अग्रलेखातून स्वागत केले होते. योगायोगाने योगेश हा बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या सामना मध्ये काम करीत होता.  
        ७ जानेवारी १९९६ रोजी अंबरनाथ येथील शिवसेतू या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, कामगार मंत्री साबिरभाई शेख, पालक मंत्री तसेच वन व पर्यावरण मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत होणार होते. दळभद्री राजकारण सुरू झाले आणि ६ जानेवारी १९९६ रोजी कुणकुण लागली की हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या हट्टामुळे रद्द करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या निकटवर्तीय ॲडवोकेट शशिकला रेवणकर या आहुतिच्या परिवारातील एक घटक असल्याने ६ तारखेला रात्री रेवणकरताईंनी साबिरभाई ना दूरध्वनीवरून विचारले की काय घडले ? कार्यक्रम कां रद्द झाला ? साबिरभाई म्हणाले, प्रत्येक कां ला उत्तर नसते आणि काही प्रश्न विचारायचे नसतात. योगेश रात्रभर अस्वस्थ होता. मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांच्या समवेत घनिष्ठ संबंध असल्याने योगेशने सकाळी सात वाजताच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ट्रंककॉल लावला. भालचंद्र  साप्ते गुरुजी फोनवर होते. घनिष्ठ संबंधांमुळे साप्ते गुरुजींनी तत्काळ योगेशला दुसऱ्या क्रमांकावर येण्यास सांगतांनाच मनोहर जोशी सर निघण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. तत्काळ योगेशने दुसऱ्या क्रमांकावर ट्रंककॉल लावला. साप्ते गुरुजींनी मनोहर जोशी यांना तो जोडून दिला. मनोहर जोशी आणि योगेश यांच्यात झालेल्या बोलण्यामुळे मनोहर जोशी यांनी अंबरनाथ येथे येण्यासाठी होकार दिला. 
        अंबरनाथ येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचे कोणतेही फलक नव्हते. योगेशने सकाळी सात पासून साडेदहा पर्यंत सारी सूत्रे हलविली. शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. बरोबर साडे अकरा वाजता टिटवाळा येथून मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि धर्मवीर आनंद दिघे हेलिकॉप्टरमधून अंबरनाथ येथे आले. प्रवीण वैद्य यांना सोबत घेऊन गिरीशने पुलाच्या उद्घाटनप्रसंगी वार्तांकनाची योग्य जबाबदारी पार पाडली. सरकारी, निमसरकारी, राजकीय, सामाजिक सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. धर्मवीर आनंद दिघे आणि कामगार मंत्री साबिरभाई शेख हे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या समवेत व्यासपीठावर होते. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दादासाहेब कांबळे नगराध्यक्ष या नात्याने हजर होते. कार्यक्रम प्रसंगी गिरीशने आहुतिचा विशेषांक काढला होता आणि मनोहर जोशी यांनी त्या आधारे भाषण करतांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा योगेशने आपल्या साक्षीत उल्लेख केला आणि त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात निर्दोष मुक्त झालो, असा आवर्जून उल्लेख केला. मनोहर जोशी यांचे अर्धे भाषण योगेशचे कौतुक करणारे होते. हे पाहून समारंभस्थळी एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या वसंत त्रिवेदी यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. योगेशचा निर्णय योग्य होता, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम संपल्यावर उपस्थित जुन्या जाणत्या लोकांनी वसंतरावांना गाठले आणि विचारले आज कसे वाटते. त्यावर  वसंतरावांनी समाधानपूर्वक उत्तर दिले. ते म्हणाले, आज माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. आज पर्यंत वसंतरावांचे चिरंजीव अशी ओळख होती ती ओळख बदलून वसंतराव हे योगेशचे वडील ही ओळख होणे अपेक्षित होते आणि मुलांनी तो विश्वास निर्माण केला आहे असे सांगतांना वसंतवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते.             
             अंबरनाथ नगरपालिकेतील शिक्षण समिती मध्ये चांगले काम करण्यासाठी वसंत त्रिवेदी यांनी तयारी दर्शविली होती. परंतु राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन योगेश बरोबर चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेतली. २८ फेब्रुवारी १९९६ रोजी योगेशने मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना साकडे घातले आणि त्यांनी तातडीने मुंबईला स्वतः च्या स्वेच्छाधिकारातून एक सदनिका उपलब्ध करून दिली. योगेश आणि सौ. माया या दोघांनी धावपळ करुन कागदपत्रांची पूर्तता केली.  
      ८ एप्रिल १९९६ रोजी छातीत दुखतंय असे वसंत त्रिवेदी यांनी सांगितले. डॉ. हेमंत चिटणीस यांच्या कडे योगेश आणि गिरीश यांनी उपचारासाठी त्यांना नेले. तपासणी अंती मुंबई येथे नायर रुग्णालयात हलविण्याचे ठरले. पेसमेकर बसवावा लागेल असे डॉ. हेमंत चिटणीस म्हणाले. सर्वत्र धावाधाव झाली. ९ तारखेला, नायर रुग्णालयात वसंतरावांनी योगेशला विचारले की, अरे, आचारसंहिता असल्यामुळे दलितमित्र पुरस्कार नावांची घोषणा होणार नाही कां ? योगेश बरोबरचा हा शेवटचा संवाद. योगेश विचार करीत करीत घरी आला. तिकडे योगेशचा आतेभाऊ सुरेश आणि गिरीश दोघे रुग्णालयात वसंत त्रिवेदी यांच्या सोबत होता. सायंकाळी अचानक वसंत त्रिवेदी कोमात गेले होते. ९ एप्रिल १९९६ ची मध्यरात्र उलटली आणि बरोबर एक वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आणि सौ. मनोरमा त्रिवेदी यांनी देहदानाचे अर्ज भरले होते. वसंत त्रिवेदी कोमात असतांनाच डॉ. हेमंत चिटणीस यांच्या समवेत योगेशने संपर्क साधून पुढचे सोपस्कार विचारले. डॉ. चिटणीस यांनी अरे थांब, अजून काहीच झालेले नाही, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण परिस्थितीची कल्पना असल्याने योगेश आणि गिरीश यांनी मानसिक तयारी केली होती. ते सर्वांबरोबर वावरत होते. एक वाजता वसंत त्रिवेदी यांनी इहलोकीची यात्रा संपविली होती. घरी माया, मनीषा, वृषाली, मीना मनोरमा त्रिवेदी यांच्या सोबतीला होते. लेले परिवाराकडे पुढची यंत्रणा राबविण्यासाठी चर्चा सुरु होत्या. साबिरभाई शेख यांना वसंत त्रिवेदी यांचे देहावसान झाल्याचे फोन करून योगेशने सांगताच ए १० या शासकीय निवासस्थानाहून साबिरभाई पहाटे १.२५ ला नायर रुग्णालयात हजर झाले. पत्रकार मित्र संजय डहाळे, राजेंद्र कांबळे, सदानंद खोपकर नायर रुग्णालयात धावले. साबिरभाई शेख यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पहाटे चार वाजता पार्थिव ताब्यात हवे, असे सांगितले. बरोबर चार वाजता वसंत त्रिवेदी यांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका नायर रुग्णालयातून निघाली. साबिरभाई ए १० वर रवाना झाले. 
        अंबरनाथ येथे पोहोचताच परांजपे चाळीत प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रकवर वसंत त्रिवेदी यांचे पार्थिव ठेवण्यात आले. 'वसंत त्रिवेदी अमर रहे' चा फलक अग्रभागी लावण्यात आला होता. सुभाषवाडी या कर्मभूमी जवळ असलेल्या हिंदू स्मशानभूमी मध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास साबिरभाई शेख आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुखाग्नी देण्यात आला. एक धगधगता यज्ञकुंड निमाला होता. 
      वसंतरावांचे शेवटचे वाक्य योगेशचा पिच्छा पुरवित होते. कल्पना नव्हती. पण वसंत त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदी या दोघांचे प्रस्ताव पुणे येथील सामाजिक न्याय विभागात वसंत त्रिवेदी यांनी दिले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शुभहस्ते मनोरमा त्रिवेदी यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार पुणे येथील एका समारंभात प्रदान करण्यात आला. वसंत त्रिवेदी यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत ना स्वातंत्र्य सैनिक अथवा आणीबाणी काळात भूमिगत चळवळ राबविली म्हणून शासकीय सुविधा मिळाल्या नाहीत. केवळ आणि केवळ हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. प्रभाकर जोशी यांच्या कडून पाच रुपये उसने आणून दसरा साजरा करणारे, दीनदुबळ्या समाजातील नाहीरे वर्गातील लोकांसाठी आपल्या जीवनाची समिधा आहुति नावाच्या यज्ञकुंडात टाकून कृतार्थ जीवन जगल्याचे वसंत त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदी यांनी समाजासमोर एक उदाहरण घालून दिले. या दोघांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! 
        वसंतराव त्रिवेदी यांनी स्वतः खडतर आयुष्य जगतांना मोलाचे, अनुभवाचे अनेक सल्ले दिले जे आमच्या आयुष्यात सदैव कामाला आले. यातील काही मोजके येथे देत आहोत. 
   # पत्रकारिता करतांना नेहमी सकारात्मक पत्रकारिता करायची, वाचकांना नेहमी चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना आणि चांगले उपक्रमांची सविस्तर सचित्र माहिती द्यावी. 
 # नीती सोडू नका, नियती कोणाला सोडणार नाही. 
  # कोणाला पोटाला लावता आले नाही तरी एक वेळ चालेल, पण कोणाच्या पोटावर मारू नका. 
  # जे जे चांगले करता येईल ते करीत रहा. 
  # निसर्गाचा नियम आहे जे आपण त्याला देऊ ते आपणाला सव्याज परत करते. म्हणून आपण समाजाला शिव्या दिल्या तर आपणासही शिव्याच मिळतील. समाजाला ओव्या दिल्या तर आपल्यालाही ओव्याच मिळतील. म्हणून कायम ओव्या देण्याचंच कर्तव्य करा. 
  # जगात एकही व्यक्ती अशी  नाही की त्याच्यात सद्गुण नाही आणि एकही व्यक्ती अशी नाही ज्यात दुर्गुण नाही. आपले जे जे गुण जुळतील ते जुळवून समाजहिताचे काम करावे. 
 # डोळ्याला काळा चष्मा लावला तरी काळे दिसत नाही. आपण ज्या दृष्टिकोनातून पहातो ते महत्वाचे आहे. म्हणूनच आपण नेहमी चांगल्या आणि सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातूनच पहावे.             # दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींची रेषा मोठी असेल तर आपलीसुद्धा कामाची रेषा सकारात्मक काम करून मोठी करावी. दुसऱ्याच्या चांगल्या कामाची रेषा पुसण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.
  # आपल्याला किती जणांनी मदत केली आहे आणि त्यातुलनेत आपण किती जणांना मदत केली आहे याचा वरचेवर लेखा जोखा मांडावा.   हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे; सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ||

   *-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)*

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन