सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार --
माझगावमधील प्रिन्स अली खान रुग्णालय प्रकरणी
नवीन रुग्णालयासह कामगारांच्या हक्कांसाठी आमरण उपोषण
मुंबई / रमेश औताडे
माझगाव परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालय 2022 मध्ये धोकादायक इमारत घोषित (स्ट्रक्चरल ऑडिट C–1) झाल्यानंतर बंद करण्यात आले. मात्र अद्यापही नवीन रुग्णालय उभारण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रुग्णालय बंद झाल्यापासून शेकडो कामगार रोजगारापासून वंचित झाले असून याबाबत न्याय मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.
उपोषणाचे नेतृत्व शिव सहकार सेनेच्या उपाध्यक्षा आशा विचारे मामीडो करत असून त्यांनी सांगितले की—
तात्काळ नवीन रुग्णालय बांधावे
नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना पूर्वीप्रमाणेच रूजू करून घ्यावे
आणि तोपर्यंत सर्व कामगारांना मासिक वेतन, बोनस, लीव्ह पगार व मेडिकल सुविधा देण्यात याव्यात
तसेच सेवा निवृत्तीनंतरची सर्व देणी, हक्क, वारसांना कायमस्वरूपी नोकरी या मागण्या मान्य कराव्यात
न्यायालयीन आदेशांनाही न जुमानण्याचा आरोप
कामगारांच्या म्हणण्यानुसार, 2014 मध्ये बीएमसीने व्यवस्थापनाला नोटीस देत नवीन रुग्णालय उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 2022 मध्ये C–1 ऑडिट आल्यानंतर रुग्णालय तोडण्याची परवानगी घेण्यासाठी व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाने मुख्य इमारत (Main Building) तोडण्याची परवानगी दिली असली तरी ओपीडी, कन्सल्टेशन, ऑन्कॉलॉजी, ब्लड बँक, लॅब, किचन, फार्मसी इत्यादी विभाग चालू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
मात्र, कामगारांच्या आरोपानुसार व्यवस्थापनाने न्यायालयाचे आदेश न पाळता संपूर्ण रुग्णालयच बंद केले आणि शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. तसेच काही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने रिझाइन लेटर्स वर सांगितल्याशिवाय सही न केल्यास पगार रोखण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप आहे.
कामगारांची आर्थिक व मानसिक स्थिती बिकट
अचानक रोजगार बंद झाल्याने अनेक कामगारांवर घरकर्ज, वैद्यकीय कर्ज, मुलांचे शिक्षण, आजारपण अशा समस्या कोसळल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांचे औषधोपचार थांबल्याने त्यांचा मृत्यूही झाल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.
कामगारांनी बीएमसी, ट्रस्ट, श्रम आयुक्त, वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त, उच्च न्यायालय इथपर्यंत दाद मागितली; परंतु कोणत्याही ठिकाणी ठोस निर्णय न झाल्याने कामगार आझाद मैदानात उतरले आहेत.
“न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही” — आशा विचारे-मामीडो
उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की—
“आम्हाला पुन्हा नोकरी द्या, रुग्णालय सुरू करा, आमच्या मुलांचे भविष्य वाचवा. जोपर्यंत आमच्या न्याय मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सुरूच ठेवणार.”
प्रिन्स अली खान रुग्णालयातील कामगारांच्या हक्कांसाठीचे हे आंदोलन जोर धरत असून प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
7021777291
Comments
Post a Comment