प्रेमाचा संदेश द्वेषात बदलणे दुर्दैवी — धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र
प्रेमाचा संदेश द्वेषात बदलणे दुर्दैवी — धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र
मुंबई / रमेश औताडे
धार्मिक जन मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. पैगंबर मोहम्मद यांच्या प्रेमाच्या शांततामय अभिव्यक्तीवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाया, अटक आणि एफआयआरचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
शाकिर भाई शेख यांनी सांगितले की “आय लव्ह मोहम्मद ” ही श्रद्धा आणि आदराची शांततामय अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. अशा भावनेला गुन्हा ठरविणे समाजातील ऐक्याला धक्का पोहोचवणारे आहे. अब्दुल हसीब भाटकर (उपाध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र) म्हणाले की सरकारचा दुहेरी निकष स्पष्ट दिसतो. पैगंबर यांनी सर्व सजीवांच्या अधिकारांचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
हरविंदर सिंग (राष्ट्रीय सिख मोर्चा) म्हणाले की “आय लव्ह मोहम्मद” वर वाद निर्माण करणे हे नियोजित कटकारस्थान आहे. मोहम्मद यांनी संपूर्ण मानवजातीला योग्य जीवनमार्ग दिला आहे, आणि सर्वांना त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
फादर मायकेल सेबॅस्टियन यांनी म्हटले की भारताची खरी ताकद संविधान, विविधता आणि सहजीवनात आहे, परंतु निवडणुकांच्या काळात समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असतात.
मौलाना झहीर अब्बास रिजवी यांनी सांगितले की प्रेमाला द्वेषात बदलणे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी सहिष्णुता आणि बंधुत्वाची परंपरा पुन्हा जागवण्याचे आवाहन केले.
डॉ. सलीम खान म्हणाले की प्रेम ही मानवी नैसर्गिक भावना आहे, ती रोखता येत नाही. अशा अभिव्यक्तीला गुन्हा ठरविणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे.
डॉ. विवेक कोंर्डे म्हणाले की धर्माने एकत्र आणले पाहिजे, विभागले नाही पाहिजे. आज प्रेम व्यक्त करणाऱ्यांवर द्वेषाचा आरोप करणे अन्यायकारक आणि संविधानविरोधी आहे.
मौलाना आघा रूह झफर म्हणाले की मुसलमानांना आपल्या पैगंबर विषयी प्रेम व्यक्त करण्याचा तितकाच अधिकार आहे जितका इतरांना त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी आहे.
हुमायूं शेख (अध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई) म्हणाले की पैगंबर विषयीचे प्रेम हे श्रद्धेचा भाग आहे, आणि त्याचा शांततेत अभिव्यक्ती करणे हा गुन्हा नाही. मोर्च्याने सर्व धर्म आणि व्यक्तींचा सन्मान करण्याचे आणि प्रशासनाने निष्पक्षपणे काम करून निरपराध नागरिकांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment