बाजीराव देशमुखांनी उजळवली, निराधार बालकांची दिवाळी !
बाजीराव देशमुखांनी उजळवली, निराधार बालकांची दिवाळी !
३२ निराधार बालकांना दिले कपडे भेट !
मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी ) 7021777291
घरचे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या, गोरगरीब आणि रांजले गांजलेल्या कुटुंबातील, आणि ज्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांच्या मायेचे छत्र हरपलेले आहे, अशा अनाथ आणि निराधार बालकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने रंगीबेरंगी नवीन कपडे देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे उल्लेखनीय काम करत आहेत, शिराळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख ! खऱ्या अर्थाने निराधार
बालकांना आधार देण्याचे लाखमोलाचे काम त्याच्या हातून घडत आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण ! हा सण प्रत्येकाच्या जीवनात रोषनाई घेऊन येतो. नवचैतन्य घेऊन येतो. गरिबातल्या गरीब कुटुंबातही आई वडील मुलांसाठी नवीन कपडे, फटाके आणि फराळाच्या विविध पदार्थांचे नियोजन केले जाते. यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित होतो. परंतु ज्यांना आई नाही, वडीलही नाहीत अशा निराधार आणि अनाथ बालकांना आधार देण्याचे काम, दिवाळी सणाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे काम, त्यांच्या जीवनात आनंदाचा दीप पेटवण्याचे काम आणि या सर्वांची दिवाळी आनंदाने दवीगुणीत करण्याचे काम बाजीराव देशमुख करत आहेत.
गेली दोन वर्षे दिवाळी सणाच्या निमित्ताने शिराळासारख्या डोंगरकपारीच्या डोंगराळ, दुर्गम आणि अतिवृष्टी असलेल्या तालुक्यातील वाडी वस्तीवर अनाथ निराधार मुलांचा शोध घेतला जातो. सणापूर्वी या मुलांना रंगीबेरंगी कपडे बाजीराव देशमुख स्वखर्चाने त्यांना घरात नेऊन पोहोच करत आहेत. आई वडीलांची ऊणीव या मुलांना भासू नये, या मुलांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी त्यांची ही अखंड धडपड सुरू आहे.
गतवर्षी त्यांनी ज्या मुलांच्या डोक्यावरील आईचे, वडिलांचे किंवा आई-वडिलांचे दोहोंचेही छत्र हरपले आहे, अशा मुलांचा शोध घेतला होता. आणि तालुक्यातील तब्बल ४५ निराधार बालकांना दिवाळीच्या निमित्ताने रंगीबेरंगी कपडे भेट दिली. या मुलांच्या जीवनात सुखाची पहाट निर्माण केली.
शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव गावचे सुपुत्र असलेले बाजीराव देशमुख भारतीय सैन्य दलात साडेबावीस वर्षे सुभेदार म्हणून कार्यरत होते. देशसेवेसाठी उमेदीचा काळ त्यांनी सैन्यात घालवला आहे. मातृभूमीसाठी त्याग केला आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गेली १७ वर्षे ते शिराळा पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवला वाढावी यासाठी प्रगत माझा वर्ग हा महत्वकांक्षी उपक्रम ते गेली आठ वर्षे शिराळा तालुक्यान सातत्याने राबवत आहेत. शाळा भेटीच्या वेळी तालुक्यामध्ये फिरताना अनेक शाळांमध्ये त्यांना विविध कारणांनी, प्रसंगांनी परिस्थिती निर्माण होऊन अनाथ, निराधार बालके आढळून आली. कोरोना काळातही अनेकांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अशा निराधार आणि पोरक्या मुला मुलींना आई वडीलांची कमतरता जाणवू नये. त्यांना दिवाळी सणासाठी नवीन कपडे मिळवीत, ही मुले सणाच्या आनंदापासून पारखी होऊ नयेत, ही संवेदनशीलता बाळगून ते धडपडत आहेत.
यावर्षी त्यांनी शिराळा तालुक्यातील विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या, आणि ज्यांच्या जीवनातून आई-वडील दोघेही निघून गेले आहेत. त्यामुळे ते पोरके आणि निराधार झाले आहेत अशा बालकांचा शोध घेतला. शिरसटवाडी, गुढे, अस्वलेवाडी, पाचुंब्री, सागाव, मणदूर, वाडीभागाई, भाटशिरगाव अशा विविध गावांमध्ये, वाडी वस्तीवर, सामान्य गरिब कुटुंबात तब्बल ३२ निराधार विद्यार्थी आढळले. या मुलां मुलींचा सांभाळ आजी, आजोबा, चुलते करत आहेत. या सर्वाना दीपावलीच्या अगोदर सणासाठी रंगीत कपडे त्याच्या घरी जाऊन दिली गेली. या निमित्ताने या निराधार मुलांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम त्यांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत असताना,जे का रांजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संत तुकाराम महाराजांचा हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे मोठे काम यानिमित्ताने बाजीराव देशमुख करत आहेत. खऱ्या अर्थाने ते अनाथांचे नाथ झाले आहेत. त्यांनी केलेले कार्य समाजाला निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्यांनी लावलेला हा एक दिवा, निराधार बालकांच्या जीवनाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल, त्यांचे जीवन उजळून टाकण्याचे काम करेल, हे निश्चित !
शब्दांकन
दिपक रोकडे, सर
जागर शिक्षणाचा प्रणेते
जि.प.शाळा काळमवाडी
९७६७६५२२२४
Comments
Post a Comment