निविदा प्रक्रियेत अनियमितता: मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना तात्काळ कारवाईचे आदेश
निविदा प्रक्रियेत अनियमितता: मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना तात्काळ कारवाईचे आदेश
मुंबई / रमेश औताडे
दक्षिण मुंबईतील हिंदमाता परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पावसाळी पाण्याचा निचरा विभागाने मागवलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
दरवर्षी हिंदमाता आणि मडकेबुवा चौक परिसरात पावसाळ्यात साचणारे पाणी काढण्यासाठी पंप बसवण्याची प्रक्रिया राबवली जाते. यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत निविदा मागवल्या जातात. मात्र, यावर्षीच्या निविदा प्रक्रियेत मानक निविदा कागदपत्रे (SBD) नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे.
निविदा अटींमध्ये आर्थिक निकषांव्यतिरिक्त, विशिष्ट पंप क्षमतेचे निकष घालण्यात आले होते, ज्यामुळे केवळ काही ठरावीक कंत्राटदारांनाच संधी मिळाली. तसेच, सहभागी होणाऱ्या कंपन्यांसाठी किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती. या कठोर अटींमुळे गेल्या वर्षी समाधानकारक कामगिरी करणाऱ्या काही कंपन्या या स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या. परिणामी, याचा थेट फायदा काही मोजक्या कंपन्यांनाच मिळाल्याचा आरोप आहे.
मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून आर्थिक अनियमितता केली असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधीही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील विविध निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून गैरप्रकार रोखण्याची भूमिका घेतली होती.
महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. निविदा तात्काळ रद्द करून नवीन निविदा मागवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment