आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा
मुंबई / रमेश औताडे
३० सप्टेंबरपर्यंत मानधनवाढ, ग्रॅच्युइटी आणि मासिक पेन्शनचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार असून राज्यभर रस्ता रोको करणार असल्याचा इशारा अंगणवाडी नेत्या शुभा शमीम यांनी आझाद मैदानात दिला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने २३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आह. महिला व बालविकास मंत्र्यांनी २६ तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच कॅबिनेटमध्ये मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यांच्या विनंतीवरून बेमुदत उपोषणाचे रुपांतर बेमुदत धरण्यामध्ये करण्यात आले. २५ सप्टेंबर रोजी सुमारे १६ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली. २६ सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यामध्ये मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले व मागण्या कॅबिनेटमध्ये मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केले.
इतके होऊनही शासनावर काही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे आज धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन ३० सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास १ ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे. एम ए पाटील, दिलीप उटाणे, कमल परुळेकर,भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे,जयश्री पाटील,संगीता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment