दलालांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
दलालांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
मुंबई / रमेश औताडे
कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले व मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली हे घेराव आंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस तपास इत्यादी दाखले मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात. मात्र दलालांच्या माध्यमातून हीच कामे दोन दिवसांत कशी काय होतात ? याबाबत प्रश्न उपस्थित करत ॲड. अमोल मातेले यांनी प्रशासनाला धारेवर घेतले.
अवघ्या ४० रुपयांत मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी जाणूनबुजून त्रुटी दाखवून अर्जदारांना जास्त रक्कम मागत त्रास दिला जातो.
"नेटवर्क नाही, वीज नाही, वरिष्ठांचे आदेश" अशा कारणांवर नागरिकांना परत पाठवले जाते. मात्र दलालांच्या माध्यमातून कोणतीही अडचण येत नाही. हे सर्व प्रकार प्रशासनाच्या संगनमताशिवाय होणे शक्यच नाही असा आरोप त्यांनी केला.
अधिवास, उत्पन्न, वारस तपास यांसारख्या प्रमाणपत्रासाठी १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे काटेकोर आदेश द्यावेत. कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
दलालांच्या गैरप्रकारांवर विशेष मोहीम हाती घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तहसीलदार कार्यालयाने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर आम्ही वरिष्ठ प्रशासनाकडे तसेच लोकशाही मार्गांनी आंदोलन तीव्र करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Comments
Post a Comment