बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र
बृहन्मुंबई महानगरपालिकेची
प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र
मुंबई / पी आर न्यूज
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून २० जानेवारी २०२५ एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक विरोधी ही मोहीम यापुढे देखील तीव्र गतीने सुरु राहणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.
यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार आहे. उप आयुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार पथके गठीत करण्यात आली आहेत. पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होत आहे.
उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली आहे. १ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत ५ हजार ७८३ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११८ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे १६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही अधिसूचना व सुधारणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. (https://www.mpcb.gov.in/waste-management/plastic-waste). या अधिसूचनेनुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment