लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावाचा भव्य नागरी सत्कार
लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावाचा भव्य नागरी सत्कार
मुंबई / रमेश औताडे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे.
हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी सोमवारी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिव सुशांत शेलार, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या अॅड सुशीबेन शहा, युवासेना सरचिटणीस अमेय घोले उपस्थित होते.
शेवाळे म्हणाले की जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण झाला. त्यामुळे शिवसैनिक आणि राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने एकनाथ शिंदे आणि निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.
शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नातं आहे. मुंबईकरांनी नेहमीच शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करुन शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प शिवसेनेकडून येत्या २३ जानेवारी रोजी केला जाईल, असे शेवाळे म्हणाले.
येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार
शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता शेवाळे म्हणाले की उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल.
Comments
Post a Comment