संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा
मुंबई / रमेश औताडे
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
बीड जिल्हयातील मसाजांग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिला असून मारेक-यांना कठोर शिक्षा होत नाही तसेच राजकीय वरदहस्त असणा-या नेत्याची हकलपट्टी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे अंकुश कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील,रघुनाथ पाटील, महेश डोंगरे ,धनंजय जाधव आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. बिड जिल्ह्याचा बिहार होऊ नये व संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून काढून टाकावे.
धनजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकी कराड यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडे यांना सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा. हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकात्यंवर कठोर कारवाई करावी. वाल्मीक कराड यांच्या आर्थिक व्यवहारांची ई डी कारवाई करण्यात यावी तसेच त्याची नार्कोटेस्ट करण्यात यावी.
जो पर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी होत नाही तो पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेथे जेथे कार्यक्रम होतील त्या त्या कार्यक्रमाला जाऊन निदर्शने करावी असे अंकुश कदम यांनी मराठा समाजाला आवाहन केले.
यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, बिड जिल्ह्याचा बिहार झाला आहे तेथील काही तरुण शस्त्र जवळ ठेऊन ते सोशल मीडिया वर दाखवत दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतः घेऊन बिड चा बिहार होऊ देऊ नये.
२८ तारखेपर्यंत जर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारची न्यायाची भूमिका दिसली नाही तर पुढची राज्यस्तरीय बैठक घेऊन तीव्र आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. असे यावेळी कदम यांनी सांगीतले.
आरोपी वाल्मीक कराड ज्याच्यावर खंडणी गुन्हा दाखल असतानाही त्याला पोलिस अद्याप अटक करू शकले नाही. संतोष देशमुख यांची हत्या ही जाणीव पूर्वक करण्यात आली आहे जेणेकरून त्याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही, म्हणून आजची बैठक ही सरकारने गांभीर्याने घ्यावी असे कदम म्हणाले.
Comments
Post a Comment